वरखेडमध्ये चोवीस वर्षांची तान्ह्या पोळ्याची परंपरा कायम; बालकांचा उत्स्फूर्त सहभाग

वरखेड नगरीत चोवीस वर्षांची तान्ह्या पोळ्याची परंपरा उत्साहात

श्री माणिक वाचनालयाचा अभिनव उपक्रम; बालकांचा उत्स्फूर्त सहभाग

तिवसा, दि. ११ सप्टेंबर २०२६ :
श्री माणिक वाचनालय व श्री गुरुदेव व्यायाम प्रसारक मंडळ, श्रीक्षेत्र वरखेड यांच्या वतीने बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणारा तान्ह्या पोळ्याचा पारंपरिक उत्सव यंदाही उत्साहात पार पडला. या उपक्रमाला यंदा चोवीस वर्षे पूर्ण झाली आहेत.

बालकांमध्ये पारंपरिक संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलतेची जपणूक व्हावी, या उद्देशाने श्री सुरेंद्रजी बेलूरकर यांनी तान्ह्या पोळ्याचे आयोजन सुरू केले. यंदाच्या कार्यक्रमात बालकांनी सजविलेल्या बैलांसह मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

विविध क्रमांकांना रोख बक्षिसे

तान्ह्या पोळ्यातील उत्कृष्ट सजावट व सहभागासाठी विविध बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांकाचे ५०१ रुपयांचे बक्षीस डॉ. सुरेंद्र नाकाडे यांच्या वतीने चि. अर्णव निलेश खैरकर याला देण्यात आले.

द्वितीय क्रमांकाचे ३५१ रुपयांचे बक्षीस सौ. दिपाली मुकेश कावलकर यांच्या वतीने कु. शर्वरी श्याम कोल्हे हिला मिळाले. तृतीय क्रमांकाचे ३०१ रुपयांचे बक्षीस सुनील अग्रवाल यांच्या वतीने कु. नियती निळकंठ अलोने हिला देण्यात आले.

चतुर्थ क्रमांकाचे २०१ रुपयांचे बक्षीस सौ. संगीताताई बेलूरकर यांच्या स्मरणार्थ श्री नितीन अंबादास बेलूरकर यांच्या वतीने कु. काव्या ज्ञानेश्वर बेलूरकर हिला देण्यात आले. पाचव्या क्रमांकाचे २०१ रुपयांचे बक्षीस श्री अनिल भाऊ बापूराव भोयर यांच्या वतीने चि. अनुत्तर मनोहर याला देण्यात आले.

पारंपरिक वेशभूषेलाही बक्षीस

पारंपरिक झळती व वेशभूषेसाठी श्री कावलकर बंधू, अर्जुन शिवार यांच्या वतीने १५१ रुपयांचे बक्षीस चि. विराज दिवाकर कडू याला देण्यात आले. तसेच माजी सरपंच श्री राहुल शालिकराम तायडे यांच्या वतीने १०१ रुपयांचे बक्षीस, तर श्री तुळशीराम भोयर यांच्या स्मरणार्थ श्री नरेश तुळशीराम भोयर यांच्या वतीने २०२ रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

बालकांना खाऊचे वाटप

तान्ह्या पोळ्यानिमित्त बालकांना पेन, पेन्सिल, बिस्किटे, चॉकलेट व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच अपेक्षा महिला सहकारी पतसंस्था, तिवसा, श्री मारोतराव भगत, विक्रांत कावलकर व श्री माणिक वाचनालय, श्रीक्षेत्र वरखेड यांच्या वतीने बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.

दिनकर बोके यांनी दरवर्षी कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकरची व्यवस्था विनामूल्य करून देण्याचे जाहीर केले.

भजन, कविता व पारंपरिक कार्यक्रम

कार्यक्रमादरम्यान महिलांनी भजने व कविता सादर केल्या. मुकुंद होले, दादासाहेब पाटेकर, तुकाराम गंदे आणि श्रीमती ताई होले यांनी पारंपरिक झळती सादर केली.

यावेळी श्री गुरुदेव प्रचारक श्री माणिकदादा बेलूरकर यांनी गावातील नागरिक व देणगीदारांचे कौतुक केले.

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

बक्षीस वितरण समारंभ डॉ. सुरेंद्र नाकाडे, सुनील अग्रवाल, अनिल भोयर, अरुण बोके, मारोतराव भगत, विक्रांत कावलकर, नरेश भोयर, तुकाराम गद्रे, क्षितिज रमेश चौधरी, नितीन अंबादास बेलूरकर, सुभाष धुर्वे, संदीप निमकर, संदीप मनगटे, चंद्रशेखर कडू, दिलीप कांडलकर, राजेश लांडे, सौ. भारती पाचघरे, रेखा खैरकर, सौ. दिपाली मुकेश कावलकर व भारती बेलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

तान्ह्या पोळ्याचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन श्री उद्धवजी बेलूरकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री अभिजित बेलूरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. वंदना बाळासाहेब हरणे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंथन बेलूरकर, तुकाराम गंदे, सुभाष धुर्वे व कु. स्वरांगी बेलूरकर यांनी परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रवंदनेने तान्ह्या पोळ्याच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

0
0

Leave a Reply

Realted News