नियमित स्वच्छतेचा अभाव; अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर — तातडीच्या उपाययोजनेची नागरिकांची मागणी
कारंजा : प्रतिनिधी
तालुक्यातील सारवाडी येथील महामार्गालगत असलेल्या सार्वजनिक मूत्रीघराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, नियमित स्वच्छतेअभावी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. मूत्रीघराच्या अस्वच्छतेचा त्रास स्थानिक दुकानदार, प्रवासी तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत असून, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर बनला आहे.
मूत्रीघरामध्ये घाण साचल्याने अस्वच्छता वाढली असून, परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दैनंदिन स्वच्छता, पुरेशा पाण्याची उपलब्धता आणि नियमित निर्जंतुकीकरण या मूलभूत बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असताना त्यामध्ये सातत्याचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची योग्य देखभाल न झाल्यास दुर्गंधीबरोबरच डास, माशा व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. परिणामी संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सुविधेची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
तातडीने स्वच्छता करण्याची मागणी
सारवाडी ग्रामपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मूत्रीघराची तातडीने स्वच्छता करावी, परिसरातील कचरा हटवावा, पाणी उपलब्ध करून द्यावे आणि नियमित साफसफाईचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. केवळ एकदाच स्वच्छता न करता सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
विनायक देशमुख, ग्रामपंचायत अधिकारी, सारवाडी यांनी सांगितले की, “सफाई कामगाराला नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, दुर्लक्ष झाल्याने पुन्हा उद्या स्वच्छता करण्यास सांगतो.”
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर तातडीने कार्यवाही होऊन स्वच्छतेची नियमित व्यवस्था प्रत्यक्षात कायम राहते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.







