August 15, 2025 11:10 am

अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच

नोंदणी नसेल तर, तुमचा अकरावीचा प्रवेश होणार नाही

अकरावीचे प्रवेश पोर्टल आजपासून सुरू, सर्व महाविद्यालयांत केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश प्रेस नोट २-3

काटा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर व संजय गणोरकर
नागपूर : गेल्या वर्षीपर्यंत काही ठराविक महापालिकांच्या क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात होते. यावर्षीपासून संपूर्ण राज्यात केंद्रीय पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश केले जात आहेत. त्यामुळे केंद्रीय प्रवेश समितीकडे ज्या महाविद्यालयांनी नोंदणी केली नाही आणि जे विद्यार्थी नोंदणी करणार नाहीत, त्यांचे प्रवेश मान्य केले जाणार नाहीत – असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

                         दरम्यान, राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीचे ऑनलाइन पोर्टल १९ मे पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांशी संलग्नित कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीद्वारे पूर्ण करावी लागणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतिक्रमही नोंदवायचा आहे. त्यांच्या गुणानुसार पसंतीचे महाविद्यालय मिळेल, अशी माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे सदस्य डाॅ. जयंत जांभुळकर यांनी दिली.
                         शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्याकडे असलेल्या प्रवेश क्षमतेची माहिती १७ मे पर्यंत मागविण्यात आली होती. या-माहितीनुसार विदर्भात १२७५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश होणार आहेत. नागपूर जिल्ह्यात हा आकडा १२५ च्या जवळपास आहे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांचा पसंतिक्रम टाकायचा आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

१९ व २० मे रोजी सकाळी ११ वाजतापासून केवळ सरावासाठी ऑनलाइन नोंदणी व पसंतिक्रम भरणे.
२१ मे सकाळी ११ वाजतापासून २८ मे सायंकाळी ६ वाजतापर्यंत: ऑनलाइन नोंदणी व पसंतिक्रम भरणे.
३० मे सकाळी ११ वाजता: प्राथमिक सामान्य गुणवत्ता यादी प्रकाशित.
३० मे ते १ जून: सामान्य गुणवत्ता यादीवर आक्षेप/ तक्रारी आणि सुधारणा.
३ जून दुपारी ४ वाजता: अंतिम गुणवत्ता यादी जाहीर.
६ जून सकाळी १० वाजता: प्रवेशाच्या पहिल्या राउंडसाठी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी प्रकाशित.
६ जून ते १२ जून: प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पां. कॉलेज स्तरावर कागदपत्रे पडताळणी व प्रवेश.

एमसीव्हीसीचे प्रवेश ऑफलाइन

                      गेल्या वर्षी व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) चे प्रवेशही केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रणालीद्वारे झाले होते. यंदा एमसीव्हीसीला ऑनलाइन प्रक्रियेतून वगळले आहे. पसंतीनुसार तै ऑफलाइन प्रवेश करू शकतील.
‘काॅलेज-ट्यूशन टायअप’च्या गोरखधंद्यावर लगाम?
                       आतापर्यंत केवळ महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश घेतले जायचे. शहरालगतच्या महाविद्यालयांना त्याचा लाभ मिळायचा. शिकवणी वर्गासी टायअप असलेल्या या महाविद्यालयांमध्ये एकमुस्त प्रवेश घेतले जायचे. आता मात्र सर्व महाविद्यालयांना केंद्रीय प्रक्रियेत सहभागी व्हावे लागत आहे. पसंतिक्रमात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, त्यांचेच प्रवेश होतील. त्यामुळे काॅलेज-टयुशन टायअपच्या एकमस्त प्रवेशाला चाप बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी ३२ हजार प्रवेश, २२ हजार जागा रिक्त
                       गेल्या वर्षी महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांच्या कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी शाखेच्या ४५,१५० जागांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये कैप राउंड व कोट्यामधून ३२,३२४ प्रवेश निश्चित झाले होते आणि तब्बल २२,८२६ जागा रिक्त राहिल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News