♦ निदर्शकांनी दगडफेक केली, वाहने जाळली;
♦ पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
मुर्शिदाबाद : मंगळवारपासून देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेने २ एप्रिल रोजी आणि राज्यसभेने ३ एप्रिल रोजी मंजूर केले. ५ एप्रिल रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा लागू झाला.
तत्पूर्वी, मंगळवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू असताना हिंसाचार झाला. निदर्शकांनी अनेक वाहने पेटवून दिली. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश आहे. निदर्शकांशी झालेल्या संघर्षात अनेक पोलिस जखमी झाले.
मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधात मुस्लिम संघटना निदर्शने करत होती. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.
जमाव हिंसक झाला. लोकांनी पोलिसांच्या गाड्या आणि इतर वाहनांना आग लावली. यानंतर घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यापासून, सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत १२ याचिका दाखल झाल्या आहेत. त्याच वेळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ११ एप्रिलपासून देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.