भावना व्यक्त करताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
सगळीकडे दिवाळी साजरी होणार
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचे कल्याण झाले. हा माझ्या समाजासाठी सुवर्णक्षण असून आज दिवाळी साजरी करा, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठीचा शासन निर्णय आल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. तसेच यावेळी मनोज जरांगे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी आधी मसुदा दिला व त्यानंतर एक तासात जीआर देखील आला. यावेळी मनोज जरांगे यांनी व्यवस्थित पडताळून जीआर वाचले. तसेच वकिलांच्या मार्फत सुद्धा सगळे जीआर व्यवस्थित तपासून घेतले. तसेच मागच्या 75 वर्षात विजय झाला नसेल असा विजय मराठ्यांचा झाला आहे, असे जरांगे यांनी म्हटले. यावेळी मराठा बांधवांनी ‘पाटील.. पाटील’ अशा घोषणाबाजी देखील केल्या.
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मराठा बांधवांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. जरांगे यांनी यावेळी मराठा आंदोलकांना आपापल्या गावी सांभाळून जा, असे निर्देश दिले. मनोज जरांगे यांना आता रुग्णालयात नेण्यात येणार असून 5 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खराब झाली असून उपचार सुरू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण संपल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासंबंधीचे जीआरही सरकारने काढले आहे. त्यामुळे जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण सोडले. यामुळे गत शुक्रवारपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सुटला आहे.