संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयासमोर लागल्या रांगा
यवतमाळ : जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असलेल्या विविध योजनांचे १ लाख ३० हजार १७५ लाभार्थी असून त्यापैकी संजय गाधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील २३ हजार ४३७ लाभार्थींचे बँक खाते आणि मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक लिंक न झाल्याने त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून आधार लिंक करण्यासाठी कार्यालयासमोर रांगा लागत आहेत. तसेच वयोवृद्ध लाभार्थींच्या बोटांचे ठसे केवायसी करण्यासाठी येत नसल्याने धावपळ करावी लागत आहे.
शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचावा म्हणून आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करण्यात येत आहे. विविध योजनांच्या लाभासाठीदेखील आधार कार्ड मोबाइल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय आधार कार्ड आणि बैंक खातेदेखील लिंक करण्यात येत आहे. आता थेट लाभार्थींच्या खात्यावर डीबीटी यंत्रणेद्वारे जमा होत आहे. त्यासाठी लाभार्थीना बँक खात्याशी आधार लिंक अपडेट करावा लागणार आहे. अजूनही जिल्ह्यातील २३ हजार ४३७ लाभार्थी डीबीटी यंत्रणेशी लिंक होऊ शकले नाहीत.
आधार अपडेशन, केवायसी, आधार लिंक करा
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे लाभ घेत असलेल्या अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर केली नाही त्यांनी आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर व बँक खाते पुस्तकाची छायांकित प्रत तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात तात्काळ सादर करण्यात यावी. – डॉ. योगेश देशमुख, तहसीलदार.
योजनेचे नाव – लाभार्थी संख्या {संजय गांधी निराधार योजना सर्वसाधारण – ४२४६६ {संजय गांधी निराधार योजना अनु. जाती – ७९२८ {संजय गांधी निराधार योजना अनु. जमाती – ८०८० {श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण- ५६८५३ {श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनु. जाती – ७२२३ {श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनु. जमाती – ७६२५
ज्येष्ठ – निराधारांचा आधार कोण? शासनास प्रश्न ज्येष्ठ निराधाराच्या बोटांचे ठसे येत नसल्याने बँकेत पैसे येऊन देखील काढता येत नाहीत. आधार लिंकसाठी बोटांचे ठसे येणे आवश्यक आहे. त्यावर आधार लिंक होते. मात्र, ७५ ते ८० वयाचे लाभार्थी यांच्या बोटाचे ठसे येत नसल्याने त्यांचे आधार लिंक होत नाही. यातून शासनाच्या योजनेचे गरीब लाभार्थी आता केवळ बोटाचे ठसे येत नसल्यामुळे निराधार ठरत आहेत.