August 15, 2025 11:06 am

आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण

3 महिन्यांपासून कारागृहात भोगत होता शिक्षा

मुंबई : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केली आहे. तळोजा कारागृहामध्ये रविवारी पहाटे टॉवेलने गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून विशाल गवळी हा तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. रविवारी पहाटे त्याने गळफास घेत जीवन संपवले आहे. यामुळे कारागृह प्रशासनावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काय होते प्रकरण?

                       कल्याण येथील कोळसेवाडी भागात चक्की नाका भागात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला अटक करण्यात आली होती. विशाल गवळीने हत्या करून या चिमुकलीचा मृतदेह बापगाव येथे फेकून दिला होता. यात विशालला त्याच्या पत्नीने देखील साथ दिली होती.
                       आरोपी विशाल गवळीचे एकूण तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खासगी बँकेत नोकरीला आहे. विशालने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी त्याच्या पत्नीनेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली. एका रिक्षातून या दुर्दैवी मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून भिवंडीजवळील बापगाव परिसरात या दोघांनी नेला आणि तेथे फेकून दिला. ज्या रिक्षातून विशाल आणि त्याच्या बायकोने अल्पवयीन मुलीचा मृतदेह कल्याणमधून भिवंडीत नेला ती रिक्षाही पोलिसांनी जप्त केली होती.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रिक्षाचा वापर

                        आरोपी विशाल गवळीने ज्या रिक्षामधून अल्पवयीन मुलीचे अपहरण करत अत्याचार केले होते ती रिक्षा देखील आता पोलिसांनी जप्त केली होती. नराधम आरोपीने याच रिक्षाचा वापर करत चिमुकलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. यावेळी मागे त्याची पत्नी मृतदेहाजवळ बसली होती. या प्रकरणी दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून आरोपी विशाल गवळी तळोजा कारागृहात होता. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
                        विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होती. कल्याण पूर्व परिसरात त्याच्या दहशतीमुळे अनेक कुटुंब हा परिसर सोडून गेली होती. मात्र, विशाल गवळी याला राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्याविरोधात कठोर कारवाई होत नव्हती. विशाल गवळीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिची हत्या केल्यानंतर मित्रासोबत जाऊन दारु विकत घेतली होती. त्यानंतर तो शेगावला पळून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News