August 15, 2025 7:31 am

उमेरड एमआयडीसी स्फोटातील मृतकांच्या कुटुंबीयांना मोठी मदत

♦ प्रत्येकी 60 लाख रुपये, जखमींना 30 लाख आणि कुटुंबातील एकाला नोकरी

नागपूर : उमेरड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीत ११ एप्रिल रोजी झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेत मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिली. मृतकांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून ५५ लाख आणि शासनाकडून ५ लाख रुपये अशी एकूण ६० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जखमी कामगारांना कंपनीकडून ३० लाख रुपये मिळतील. त्यांच्यावर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जातील.
                          या दुर्घटनेत पियुष दुर्गे, सचिन मसराम, निखिल शेंडे, अभिलाष जंजाळ आणि निखिल नेहारे यांचा मृत्यू झाला. मनीष वाघ, करण शेंडे, नवनीत कुमरे, पियुष टेकाम, करण बावणे आणि कमलेश ठाकरे हे गंभीर जखमी झाले. सर्व मृतक आणि जखमी कामगार उमरेड आणि भिवापूर तालुक्यातील आहेत.

                          घटनेनंतर पालकमंत्री बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. मृतक आणि जखमी कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी देण्यात येणार आहे. शासन कामगारांच्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नागपूरच्या उमरेड येथील ॲल्युमिनियम कंपनीत भीषण आग

5 कामगारांचा मृत्यू , 6 कामगार गंभीर जखमी

नागपूर : उमरेड तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या कारखान्याला शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली. ‘एमएमपी’ असे या कंपनीचे नाव असून येथे ॲल्युमिनिअमची पावडर तयार केली जाते. या आगीत सहा कामगार गंभीर जखमी झाले असून त्यातील दोन गंभीर असल्याचे कळते. तसेच वीसहून अधिक कामगार आतमध्ये अडकल्याचे सांगण्यात येते.
                         गंभीर जखमींपैकी दोन कामगारांना उमरेड उपजिल्हा रुग्णालात तर अन्य चौघांना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. ही कंपनी गीरजवळील ग्रामपंचायत धुरखेडा परिसरात येते. या कंपनीचा परिसर जवळपास दहा एकरांत पसरला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, स्फोटानंतर कंपनीला आग लागली. दुसऱ्या शिफ्टचे काम सुरू असताना
                         ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच उमरेड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची काही वाहने घटनास्थळी दाखल झाली. तसेच नागपूर मनपाच्या अग्नीशमन दलाचीही दोन वाहने येथे दाखल इाली. मात्र, पाण्याच्या माऱ्यामुळे ॲल्युमिनिअमची पावडर आणखी पेट घेत होती. बॉयलरचा स्फोट झाल्यास खबरदारी म्हणून सहा ते सात वाहने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सज्ज होती. या आगीवर केवळ वाळूचा मारा करूनच ती विझविणे शक्य आहे, अशी माहिती उमरेडचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय मेश्राम, माजी आमदार राजू पारवे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News