खासगी आश्रम शाळेत मुलांना बेदम मारहाण, 5 जणांवर गुन्हा
मुंबई : कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पसायदान नावाच्या खासगी वसतिगृहात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तर शाळेतील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.
जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडून पाहणी दरम्यान हा प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरू केली असून या प्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यात आश्रम शाळा चालवणारा संचालक बबन शिंदे, त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे , शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
खडवलीली पसायनदान या खाजगी आश्रम शालेत बेघर, निराधार आणि गोर-गरीब मुलांना शिक्षण दिले जाते. काही दिवसांपूर्वी खडवली येथील खासगी आश्रम शाळेत मुलांना बेदम मारहाण केली जात असल्याची तक्रार ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची गंभीर दखल समितीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. समितीच्या अधिकारी वर्गाने थेट पसायदान या खाजगी आश्रमशाळेची पाहणी केली.
या वसतिगृहात 12 ते 15 मुलं राहतात त्यांच्याकडे समितीच्या सदस्यांनी विचारपूस केली. तेव्हा मुलांना मारहाण केली जात होती. प्रकाश गुप्ता या कर्मचाऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे कल्याण तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. निराधार मुलांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कल्याण तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
परीक्षेसाठी विशेष व्यवस्था
सुटका करण्यात आलेल्या बालकांपैकी काही खडवली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. त्यांची आगामी परीक्षा लक्षात घेता शिक्षण विभागाने त्यांच्या परीक्षेसाठी विशेष व्यवस्था करावी, यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधण्यात येत आहे. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या या बालकांना उल्हासनगर येथील मुलींच्या विशेष गृहात ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.