कोंढाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा हल्ला : शेतकरी चंद्रशेखर बल्की यांचा मृत्यू; कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर
नागपूर : कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शिरमी उपवनातील जाटलापूर–चिखली मार्गावर २१ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरचे शेतकरी रमेश मेश्राम यांच्या फार्महाऊससमोर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी चंद्रशेखर व्यंकटराव बल्की (रा. चिखली) हे ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास बापूराव कडवे व चंद्रशेखर बल्की हे रात्री फार्महाऊससमोर बसले होते. विलास कडवे झोपायला गेल्यानंतर थोड्याच वेळात चंद्रशेखर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास कडवे बाहेर आले असता, बल्की मृतावस्थेत पडलेले दिसून आले. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले.
गावचे पोलिस पाटील कमलेश धोटे, सरपंच राजकुमार चोपडे तसेच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एन. नाईक, उपवनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मालके, आर. एन. डाखोळे (क्षेत्र सहाय्यक, चमेली) यांच्यासह कोंढाळी पोलीस ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व पोलिस स्टाफ घटनास्थळी पोहोचले.
वन व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने पंचनामा करून मृतदेह काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दहा लाखाचा धनादेश, दहा हजार रोखघटनेची माहिती मिळताच आमदार चरणसिंग ठाकूर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मृतक चंद्रशेखर वेंकटराव बल्की यांचे गाव चिखली गाठले. तेथे बल्की कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच मृतक चंद्रशेखर यांचे वडील व्यंकटराव बल्की यांना वन विभागामार्फत मिळालेला दहा लाखाचा धनादेश सुपूर्द केला. तसेच अंत्यसंस्कारासाठी रोख दहा हजार रुपये दिले. बाकीचा १५ लाखांचा धनादेश कागदपत्रे पूर्ण झाल्यावर देण्यात येईल, असे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांनी सांगितले.













Users Today : 0
Users Yesterday : 78