डीबीटी प्रक्रिया पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर
का टा वृत्तसेवाI कळमेश्वर : तालुक्यातील निराधार अनुदान योजनेंतर्गत डीबीटी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांसाठी १७ ते २५ जुलैदरम्यान तहसील कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २ हजार ८१ लाभार्थ्यांनी सहभाग घेत विविध त्रुटींची पूर्तता करीत योजनांचा लाभ घेतला.
या शिबिरात आधार-बँक खाते लिंकिंग, मोबाइल क्रमांक अद्ययावत करणे, त्रुटीयुक्त अर्जाचे दुरुस्तीकरण अशी महत्त्वाची कामे पार पडली. यावेळी ५७७ लाभार्थ्यांनी आधार लिकिंग, १ हजार ४ लाभार्थ्यांची डीबीटी संबंधित अडचणी तत्काळ सोडविण्यात आल्या. तसेच ५०० लाभार्थ्यांच्या अर्जातील दुरुस्ती करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यावर जमा होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे लाभ रोखला गेल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत होता. या शिबिरामुळे गरजू लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तहसीलदार विकास बिक्कड, नायब तहसीलदार ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनात अव्वल कारकून बेबी झोटिंग, निरंजना गणेर, संगणक परिचालक शंतनू खापरे, किरण भाकरे, सुजाता दवणे, कोतवाल मनोज उईके, शशिकांत गणोरकर, वैभव आनडे, स्वप्निल तभाने, मंगेश पारसे आदींनी सहकार्य केले.