April 12, 2025 10:08 am

नागरिकांना मुलभूत सोयीसुविधांसाठी मुख्याधिकाऱ्याला निवेदन द्यावे लागणे खेदाचे: आशिष देशमुख

नागरी सुविधांच्या अभावाने कळमेश्वर चे करदाते नागरिक त्रस्त

नगरसेवक नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक नाही.

का टा वृत्तसेवा :

कळमेश्वर :- नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराने कळमेश्वर ची प्रथम काॅलोनी श्रीेनिकेतन काॅलोनी, बांबल लेआउट चे नागरिक एकीकडे रस्ते, भूमिगत नाल्या, स्वच्छता, पाणी तसेच सर्वत्र गाजर गवत व काटेरी झुडपांनी त्रस्त आहेत तर दुसरीकडे नगरपालिकेचे कर्मचारी हेकेखोरपणे नागरिकांना भरमसाठ कराच्या मागणी पोटी त्रस्त करत असल्याचे चित्र गावभर आहे. कराचा वेळेत भरणा न केल्याने जप्तीची धमकी देणाऱ्या नागरिकांना कराच्या बदल्यात मिळणाऱ्या नागरी सुविधा कडे मात्र मुख्याधिकाऱ्यापासून सर्वच कर्मचारी नुसत्या खुर्च्याच उबवण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. एकीकडे कळमेश्वर काटोल मार्गावरील जीवघेणी अतिक्रमणे व अवैध बांधकामाकडे हेतू पुरस्सर डोळेझाक करणाऱ्यांना भविष्यातील जीवहानीचा साधा अंदाजही येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्त्यांचे डांबर-गिट्टी उखडल्याने मोठाले खड्डे पडल्याने अपघात 

                          श्रीनिकेतन काॅलनीतील रस्त्याचे डांबरीकरण एकदाच् सन 2007 मध्ये करण्यात आले होते, तेव्हापासून आजतागायत परत त्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. याच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडून गिट्टी उखडून अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसापूर्वी रिजंट काॅन्व्हेंट मधील शिक्षिका बोरकर यांना याच खड्ड्यात अपघात होउन पायाचे हाड मोडले होते. या संपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ठिकठिकाणी नळ जोडणी करताना खोदलेले रस्ते, योग्य प्रकारे न बुजवल्यामुळे रस्त्यावर अक्षरशः नाल्या तयार झाल्या आहेत. नळ जोडणी व रस्ता खुदाईसाठी नागरिकांकडून पूर्ण पैसे वसूल करूनही  खोदलेली जागा योग्य प्रकारे न बुजविल्यामुळे व त्यावर काँक्रीटिंग न केल्यामुळे ठीक ठिकाणी रस्त्यावर अक्षरशः खड्डे तयार झालेले आहेत, याची मुळीच तमा संबंधितांना नाही.

भुमिगत नाल्या बुजल्या, कित्येक वर्षापासून सफाई नाही. 

                           ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की भरमसाठ पगार घेऊन निव्वळ खुर्च्या उबवणाऱ्या अधिकारी व विभाग प्रमुखांनी संपूर्ण गावाचा नियमित दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याची पूर्तता केली पाहिजे. निव्वळ कर वसुलीसाठी नागरिकांची कवाडं ठोकणाऱ्यांनी किमान थोडी राखून ठेवावी, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी भूमिगत नाल्यांची संपूर्ण सफाई करणे गरजेचे असते, जेणेकरून पावसाळ्यात पाणी तुंबून राहू नये. तसेच अश्या सफाईच्या नावावर थातूरमातूर कामे होताना दिसतात. ही सफाई सचोटीने व्हायलाच पाहिजे जेणेकरून नागरिकांना पावसाळ्यात दिलासा मिळेल.

मोकाट जनावरांचा हैदोस आणि बगिच्यांची दुरावस्था 

                               अनेक ठिकाणी कचऱ्याचे उकरडे आहेत, याची सफाई नियमित होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. बालोद्यान व विविध नावांचे बगीच्यांवर आजवर लाखो रुपये खर्च करूनही देखभाली अभावी सर्वच बगीच्यांची दुर्दशा झाली आहे. ग्रीन जीमच्या नावाखाली लाखो रूपयांचा केलेला खर्च? आणि आज या जीमची हालत अतीशय गंभीर आहे?. ठिकठीकाणी ग्रीन जीमची उपकरणे तूटून पडली आहेत.  काही बगीच्यांचा तर चक्क गुराढोरांनी ताबा घेतल्याचे दृश्य आहे. प्रश्न पडतो बगीच्या जनावरांसाठी आहे, की माणसांसाठी? प्रातःकाळी तसेच दिवसातून अनेकदा गावातील डुकरे, कुत्रे व ढोरं सहपरिवार ईस्ट मित्रांसह संपूर्ण श्रीनिकेतन काॅलनी, बांबल लेआउट, हुडको काॅलनीसह संपूर्ण परिसराला फेरफटका मारून नागरिकांना त्रस्त करून सोडतात. परिणामी नागरिकांना विविध रोगराईचा सामना करावा लागतो.

पिण्याच्या पाण्याची दूर्दशा

                          ठिकठिकाणी तसेच नगरपरिषद बालोद्यानासमोरील घरगुती पिण्याच्या पाण्याचे व्हाॅल्व हे जमिनीत खड्ड्यात असून, त्यात साचलेले भयंकर घाणयुक्त पाणी नळाद्वारे घरोघरी जावून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. याच खड्ड्यांमधून कुत्रे, डुकरे, गुरे पाणी पितात. लाळयुक्त घाणेरडे पाणी नागरिकांना प्यावे लागते. हा प्रकार अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे. याची दखल नगरपरिषद घेत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. तात्काळ पाण्याचे व्हाॅल्व असणारे खड्डे जमिनीपासून सुरक्षित वर करून नागरिकांच्या जीवाशी नगर परिषदेने खेळू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

                           नागरिकांच्या दैनंदिन जीवनाच्या सर्व नागरी सुविधांचे खाजगीकरण करून ठेकेदार नियुक्त केले आहेत. यावर ताण देखरेखीसाठी ठेवलेले शासकिय/ कंत्राटी कर्मचारी ‘वर्ग एक श्रेणी राजपत्रीत अधिकाऱ्यांच्या तोऱ्यात वावरताना दिसतात. त्यात काही कंत्राटी कर्मचारी तर विचारूच नका या “चहा पेक्षा केटल्या गरम ?”  नगर परिषदेच्या भोंगळ व मनमानी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी नुकतीच प्रत्यक्ष मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्यांचे निवेदन दिले. नागरिकांच्या समस्यांसाठी निवेदन देणे हीच मुळात खेदाची बाब आहे. जे मुळात नगरपालिकेचे नियमित कर्तव्य आहे, तेच बजावताना नगरपालिकेचे कर्मचारी आढळून येत नाही. परिणामीे निवेदन देणाऱ्यांमध्ये समाजसेवक आशिष देशमुख यांचे नेतृत्वात मेघराज नवले, प्रकाश पांडे, विष्णू गोरे, नितीन गेडाम, रामकृष्ण गोहने व दिनेश बांबल यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून समस्या ची जाण करून दिली याची मुख्याधिकारी सुरडकर यांनी गंभीर दखल घेत विना विलंब समस्या निपटण्याचे आश्वासन दिले आहे.

तीन वर्षापासून नगर परिषदांच्या निवडणूका न झाल्याने न .प . ची अवदसा 

                       गेल्या तीन वर्षापासून नगर परिषदांच्या निवडणूका न झाल्याने, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय वचक नसल्याचे दिसून येते. विनाविलंब नगर परिषदांच्या निवडणूका घेण्याची मागणीही जोर धरत आहे. तर दुसरीकडे आपल्याच नागरिकांना मुलभूत नागरी सोयीसुविधा पुरविण्यात हयगय करणाऱ्या निहित कर्तव्य न बजावनाऱ्या कर्मचाऱ्यांवर मग तो कोणत्याही दर्जाचा असो त्याचेवर कठोर कारवाईची मागणीही संतप्त नागरिकांनी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News