चोपड्यात रात्री 10 वाजेची घटना, निवृत्त सीआरपीएफ पित्याने केले तीन राउंड फायर
का टा वृत्तसेवा
जळगाव/ चोपडा : मुलीने प्रियकरासोबत विवाह केला. त्याचा राग बापाच्या मनात होता. मुलगी आणि तिचा पती चोपडा येथे एका हळदीच्या कार्यक्रमासाठी आले असताना बापाने मुलगी आणि जावयावर गोळीबार केला. त्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर जावयाच्या पाठीतून पोटात गोळी घुसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना शहरातील आंबेडकर नगर (खाई वाडा जवळ) येथे रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
तृप्ती अविनाश वाघ (वय 24) आणि तिचा पती अविनाश ईश्वर वाघ (वय 28, दोघे रा. करवंद ता.शिरपूर, हल्ली मु. कोथरूड पुणे) अशी दोघांची नावे आहेत. दोन वर्षांपूर्वी अविनाश व तृप्ती यांचा प्रेम विवाह झाला होता. तो विवाह पित्याला मंजूर नव्हता. अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम शनिवारी (दि.26) चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकर नगर येथे होता. त्यानिमित्ताने ते चोपडा येथे आले होते.
त्यात तृप्तीने प्रेम विवाह केला याचा राग वडील सेवानिवृत्त सीआरपीएफचा अधिकारी किरण अर्जुन मंगले(वय 48,रा. रोहिणी ता. शिरपूर जि धुळे) यांच्या डोक्यात होता. ते चोपडा येथे हळदीच्या ठिकाणी आले. त्यात त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर व तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. त्यांनी तीन राउंड फायर केले. यात मुलगी तृप्ती जागीच ठार झाली तर जावई अविनाशच्या पाठीतून गोळी पोटात घुसली तर दुसरी गोळी हाताला लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला अत्यवस्थ अवस्थेत जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
पित्याला वऱ्हाडींकडून चोप, गंभीर जखमी
भर हळदीच्या कार्यक्रमात गोळीबार केल्याने वऱ्हाडींचा संताप अनावर झाला. हळदीच्या कार्यक्रमात व्यत्यय आणल्याने त्यांनी गोळीबार करणाऱ्या किरण मंगलेला चांगलाच चाेप दिला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. दरम्यान, जावईदेखील गंभीर जखमी झाल्याने त्यालाही जळगावला हलवण्यात आले.