August 15, 2025 7:36 am

बीएमसीकडून विलेपार्लेतील जैन मंदिर जमीनदोस्त

कारवाई विरोधात जैन समाजबांधव संतप्त

भव्य मोर्चा काढणार

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पूर्व मधील कांबळीवाडी येथील 30 वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर महापालिकेने तोडक कारवाई केली. या कारवाईविरोधात जैनसमाज संतप्त झाला आहे. मुंबई महापालिकेच्या निषेधार्थ समाज बांधवांकडून शनिवार सकाळी साडे नऊ वाजता विलेपार्ले पश्चिम रेल्वे स्थानकापासून अहिंसक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग अलवाणी, जैन समाजाचे संत आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

                          बीएमसीच्या या हुकूमशाही कारभाराबाबत जैन समाजात तीव्र संताप असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे राज्यात महायुतीचे सरकार कार्यरत आहे. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर आता सरकार अंतर्गत प्रशासन कार्यरत आहे. यामुळे या कारवाईवरून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
                           या मंदिराच्या वादाबाबत जैन समाजाने बीएमसीच्या नोटिशीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 17 एप्रिल 2025 रोजी सुनावणी होणार होती, मात्र त्यापूर्वीच 16 एप्रिल रोजी सकाळी महापालिकेचे बांधकाम पथक कारवाईसाठी पोहोचले. लोकांनी विनवण्या केल्यानंतरही प्रशासनाकडून मंदिर पाडण्यात आले. त्यामुळे जैन समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच महापालिका प्रशासनाने कारवाई करायला हवी होती, असे जैन समाजबांधवांचे म्हणणे आहे. देशभरातील जैन समाजबांधव या घटनेचा सोशल मीडियावर निषेध करत आहेत.

अखिलेश यादव यांनी साधला भाजपवर निशाणा

                          समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी या कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे. आजच्या काळात देशात अल्पसंख्याक असणे हा एक शाप ठरत आहे. सध्या जैन समाजामध्ये असलेली भीती, असुरक्षितता आणि अनिश्चितता अत्यंत चिंताजनक आहे. याकडे जगभरातून लक्ष वेधले गेले आणि निषेध केला गेला. भारतातील शांतताप्रिय जैन समाजाला पद्धतशीरपणे लक्ष्य केले, असा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे.
                         अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशातील सिंगोली येथे जैन साधूंवर झालेला हिंसक हल्ला, जबलपूरमधून लीक झालेली ऑडिओ क्लिप ज्यामध्ये भाजपच्या सदस्यांनी जैनांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती आणि मुंबईतील जैन मंदिराची तोडफोड, जेथे पवित्र मूर्ती, धर्मग्रंथ आणि धार्मिक पुस्तकांची कथितपणे विटंबना केली गेली, याचा आपल्या ट्विटमध्ये संदर्भ दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News