September 10, 2025 9:38 am

महाआयटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रताप : जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा, येथील घटना

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा, येथील घटना

‘महाआयटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रताप’ 

आधार केंद्रासाठी उकळली रक्कम : आरोपी प्रतीक उमाटे शेखर ताकसांडे या दोघांवर गुन्हा दाखल

“दोन्ही आरोपी फरार : पोलिस त्यांच्या शोधार्थ मोहिमेवर” आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता…चौकशीत दोषी आढळल्याने तक्रार दाखल केली

काटा वृत्तसेवा I जिल्हा प्रतिनीधी 
वर्धा : महिला व बालकल्याण विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या आधार संचधारकांकडून लाखो रुपयांची रक्कम हडपल्याप्रकरणी संचधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीअंती जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या आदेशाने अधीक्षक अनिकेत सोनवणे यांच्या तक्रारीवरून महाआयटीचा कंत्राटी जिल्हा प्रकल्प प्रमुख प्रतीक संजय उमाटे (रा. स्नेहलनगर) व शेखर तातेराव ताकसांडे (रा. विक्रमशीलानगर) यांच्याविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
                        महाआयटीचा कंत्राटी कर्मचारी प्रतीक उमाटे हा गेल्या दहा ते बारा वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने व त्याचा जिल्हाधिकारी कार्यालयातील लहानांपासून काही मोठया अधिकाऱ्यांपर्यंत चिरमिरीवाला दांडगा संपर्क असल्याने तो चांगलाच मग्रावला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची मग्रुरी चांगलीच वाढली होती. तो जिल्हाधिकारी कार्यालयातील काही मोठया अधिका़ऱ्यांच्या खांद्यावर बसून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकांच्या व आधार संचधारकांच्या कानात xxx असल्याच्या गंभीर स्वरूपाच्या शेकडो तक्रारी होत्या.
                        महाआयटीचा कंत्राटी कर्मचारी प्रतीक उमाटे, हा भामटा जिल्हाधिकाऱ्यांच्या तोऱ्यातच वावरायचा. परंतू या भामट्या आरोंपींवर अधिका़ऱ्यांचा वरदहस्त असल्याने कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते.  या आरोपी भामट्यांचा त्रास व बणवाबणवी असह्य झाल्याने अखेर जिल्यातील १८ केंद्र संचालकांनी आरोपी प्रतीक उमाटे व त्याचा अधिनस्त आरोपी तंत्रज्ञ शेखर ताकसांडे या दोघांच्याही नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून पुरावेही सादर केले.
                        प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतीक उमाटे हा केंद्रचालकांना ५० हजार रुपयांच्या अनामत रकमेसोबतच अतिरिक्त एक ते दीड लाख रुपयांची मागणी करायचा. ती रक्कम ताकसांडे याच्या माध्यमातून ऑनलाइन किंवा रोख स्वरूपात घ्यायचा. कधी पत्नीच्या किंवा नातेवाइकाच्या नावेही रक्कम जमा झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच त्याचे पुरावेही तक्रारकर्त्यांनी दिले आहे. उमाटे याने केलेली डिमांड संचालकांनी पूर्ण केली नाही तर संच बंद ठेवायचा, तसेच त्यांना अधिकाऱ्यांच्या नावे धमकवायचा. सोबत साॅफ्टवेअर अपडेट, ऑपरेटर चेंज यासाठीही पाच ते दहा हजार रुपये मागणी करायचा, असेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले.
                         प्राप्त माहितीनुसार नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली इ. जिल्ह्यातील महाआयटीच्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रतापांवर, अनेक ‘आधार व आपले सरकार केंद्रचालकांच्या’ विवीध प्रकारच्या तक्रारी आहेत. आधार केंद्रासाठी रक्कम उकळण्यासाठी खास दलाल सुद्धा अविरत सक्रिय असल्याचे कळते.

यांच्या तक्रारीमुळे फसवणूक प्रकरण आले चव्हाट्यावर

                        संदेश बबनराव वासेकर (रा. वाघोली), अनंत नारायण वैरागडे (रा. सेलू), मंगेश पुंडलिक वाढवकर (रा. हिंगणघाट), रवी प्रकाश भालेकर (रा. हिंगणघाट), रश्मी गिरीश केळापुरे (रा. वर्धा), अंकेश गुणवंत उरकुडकर (रा. वर्धा), आशिष दिवाकर भोयर (रा. हिंगणघाट), अंबादास चहांदे (रा. हिंगणी), सोनाली वैभव चाफले (रा. वर्धा), मेघा झाडे (रा. वर्धा), अविनाश मोहनदास खेवले (रा. हिंगणघाट), प्रवीण महादेव घोटकर (रा. हिंगणघाट), पद्माकर मोतीराम देशमुख (रा. नारा), गणेश सुदेश झाडे (रा. कन्नमवार), स्वप्निल मांगे (रा. वर्धमनेरी), नीलेश मारोतराव बोधनकर (रा. वर्धा), कोमल ठोंबरे (रा. आष्टी), रूपाली सतीश पाचवारे (रा. पुलगाव) यांच्या तक्रारीवरून प्रकरण चव्हाट्यावर आले असून पोलिसांत पोहोचले आहे.

साहेबांच्या नावेही उकळली रक्कम, ते साहेब कोण?

                      आरोपी प्रतीक उमाटे याने आधार केंद्र चालकांकडून रक्कम उकळण्यासाठी चक्क साहेबांचे नाव पुढे केले आहे. साहेबांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून दरमहा दोन हजार रुपयांची मागणी करायचा, असे तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे आता हे साहेब कोण?, या साहेबांना ही रक्कम मिळायची काय? असेल तर आतापर्यंत किती रक्कम देण्यात आली?, याचाही तपास पोलिसांना करावा लागणार असल्याने साहेबांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत सर्वकाही गुपचूप सुरु होते पण, आता तक्रारीच्या ओघाने भंडाफोड झाला अनं नागपूर विभागातील सर्वच जिल्हयातील महाआयटीचे काही कंत्राटी संशयाच्या भोवऱ्यांत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
                       नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाआयटीच्या एका कंत्राटीने असाच हैदोस अख्ख्या जिल्हयात घातला होता. महाआयटीच्या कंत्राटीची पोलीसात तक्रार झाली होती. सदर पोलीस चौकशीत संबंधीत-लाभान्वीत तत्कालीन अधिकाऱ्यांनी तोंड मारल्याने प्रकरणातील आरोपीला सद्या जिल्हयातून तडीपार केले आहे. लवकरंच हे प्रकरण चव्हाटयावर येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
                      आधारसारख्या जनहितार्थ मुलभूत सेवेला कलंकित करून लाखो नागरिकांना वंचीत व त्रस्त करून सोडणाऱ्यां तसेच शासनाचे व महाआयटीचे लाखोंने नुकसान करणाऱ्यां या प्रकरणातील महाआयटीच्या भामटया आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आपले सरकार सेवा केंद्र व व्हिएलई संघटनेने केली आहे.  (क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News