♦ दोन अज्ञात आरोपींनी माजीआमदार गिरीश व्यास यांचे ५० हजार रुपये लंपास केले
♦ दारोडकर चौकाजवळ खळबळजनक घटना
नागपूर : दोन अज्ञात आरोपींनी माजी आमदार गिरीश व्यास यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या कारमध्ये ठेवलेले ५० हजार रुपये लंपास केले. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दारोडकर चौकाजवळ घडली.
व्यास कार चालवीत होते आणि त्यांच्या पत्नी मागच्या सीटवर बसल्या होत्या. दरम्यान, दोन आरोपींनी दारोडकर चौकाजवळ हात दाखवून त्यांना कार थांबविण्याचा इशारा केला. व्यास यांनी कार थांबविण्याचे कारण विचारले असता आरोपींनी कारचे ऑइल लीक असल्याचे सांगितले. त्यामुळे व्यास बाहेर निघून कारच्या खाली पाहायला लागले. दरम्यान, एका आरोपीने त्यांच्या खिशातून बॉटल बाहेर काढून व्यास यांच्या डोळ्याजवळ स्प्रे मारला, तसेच व्यास यांना काही कळायच्या आतच आरोपींनी कारमधील रोख रकमेची बॅग उचलून पळ काढला. त्यानंतर व्यास यांनी लगेच लकडगंज पोलिसांना घटनेची माहिती दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपास केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे व्यास यांना कोणतीही दुखापत झाली नाही.