मानकर विद्यालयाची यशस्वी घोडदौड
काटा वृत्तसेवा
कळमेश्वर: ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा 2 अंतर्गत गुणवत्तावाढ उपक्रमातर्गत स्पर्धेत तालुका स्तरावर वरोडा येथील मानकर आदर्श विद्यालय आणि ज्युनिअर काॅलेजने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक पटकावले असून. बक्षीस म्हणून शाळेला रोख तीन लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच नगर परिषद हायस्कूल, कळमेश्वर येथे करण्यात आले होते.
यावेळी शाळांच्या सौंदर्यीकरण, मूलभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षणाच्या वातावरण निर्मितीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा, आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला अशोक ढगे (सदस्य, महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे), डाॅ. राजीव पोद्दार, दिलीप धोटे, पं. स. कळमेश्वर गट शिक्षणाधिकारी विशाल गौर, शिक्षण विस्तार अधिकारी मंगला गजभिये, केंद्रप्रमुख डाॅ. कीर्ती पालटकर उपस्थित होते.
यावेळी आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान, शिस्त आणि स्वच्छतेची जाणीव निर्माण होत असून, शाळेचा सर्वांगीण विकास साधून शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन केले.
मुख्याध्यापिका जया मानकर यांना वैशिष्टयपूर्ण कार्यासाठी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळेचे संचालक, सचिव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. या यशाबद्दल गांधी शिक्षण संस्थेचे संचालक रमेश मानकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.