चंद्रपूर : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उइके उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये मात्र अशोक उइके यांचे नाव घेणे टाळल्याचे दिसून आले.
चंद्रपूर येथील कार्यक्रमात बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीचे तख्त राखायचे असेल तर चंद्रपूरला सोबत घेऊन जावे लागेल, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांची नाराजी अद्यापही असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या विधानावर आता स्पष्टीकरण दिले आहे. मी कुठेही नाराज नाही, माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकले नाहीत, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हे अर्धवट डोक्यातून निघालेले इंटरप्रिटेशन आहे. भाषण काय होते की विकासादरम्यान कुठेही चंद्रपूर जिल्ह्याला पैसे कमी पडू नये. विकासाला पैसे देताना मी सांस्कृतिक मंत्री म्हणून नाट्यगृहाची मागणी या गावाने केली आहे. त्यासाठी पैसे कमी पडू देऊ नका. कारण मी राज्यगीत केलेले आहे. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखत असताना चंद्रपूर जिल्हा उणे करु नका. चंद्रपूर जिल्ह्याला मायनस करु नका, असे सुधीर मुनगंटीवार म्हणले आहेत. पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कशाचीही नाराजी नाही. कशासाठी नाराजी आहे. फक्त हेच जीवन आहे. आता तरी तुम्ही समजून घ्या की माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकलेले नाही.
चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही : सुधीर मुनगंटीवार
सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी भाषण केले. ते म्हणाले, दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र त्यांच्या या विधानामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली होती. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.