♦ नागपूर ग्रामीण भागात सुरक्षा व्यवस्था मजबूत होणार
नागपूर : नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सहा नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पोलीस ठाण्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वडोदा, बाजारगाव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होली बारा या सहा ठिकाणी नवीन पोलीस ठाणी उभारली जाणार आहेत. या नव्या पोलीस ठाण्यांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्था बळकट होईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी ही पोलीस ठाणी आवश्यक होती. त्यांनी सर्व संबंधित विभागांना या प्रकल्पाला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. नवीन पोलीस ठाण्यांमुळे गावांमधील गुन्हेगारी कमी होउन चोऱ्यां, अवैध दारूविक्री धंद्यांसह विवीध गुन्हयांवर निश्चीतपणे अंकुश लागण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढणार आहे.