♦ विदर्भातसौरभ येवलेसह नम्रता ठाकरेची उल्लेखनीय कामगिरी
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २२ एप्रिल रोजी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. यंदाच्या परीक्षेत विदर्भातील १२ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
देशभरात शक्ती दुबे यांनी पहिला क्रमांक पटकावला. हर्षिता गोयल दुसऱ्या तर पुण्याचे अर्चित डोंगरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विदर्भातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जयकुमार आडे (३०० रँक), श्रीरंग कावरे (३९६), राहुल आत्राम (४८१), सर्वेश बावणे (५०३) आणि सावी बालकुंडे (५२७) यांचा समावेश आहे.
नागपूरच्या नम्रता ठाकरे यांनी ६७१ वा क्रमांक मिळवला. त्या मूळच्या वरुड तालुक्यातील असून, त्यांचे संपूर्ण शिक्षण नागपुरात झाले आहे. इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सौरभ येवले (६६९), सचिन बिसेन (६८८), भाग्यश्री नैकाले (७३७), श्रीतेश पटेल (७४६), शिवांक तिवारी (७५२) आणि अपूर्व बालपांडे (६४९) यांचा समावेश आहे.
राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले यांचे पुत्र सौरभ येवले यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. सौरभने दररोज १०-१२ तास अभ्यास केला. पहाटे ४ वाजता उठून योगा, व्यायाम आणि एकाग्रतेवर भर दिला. वडिलांचा आयएएस अधिकाऱ्यांशी असलेला संपर्क आणि आई माधुरीच्या पाठिंब्यामुळे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यूपीएससीने भारतीय प्रशासकीय सेवा, परराष्ट्र सेवा, पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट ‘अ’ आणि ‘ब’ साठी एकूण १,००९ उमेदवारांची शिफारस केली आहे.