August 15, 2025 11:07 am

रसायनयुक्त दूषित पाण्याने ‘वरोडा’ गावावर भीतीचे सावट

कळमेश्वर तहसिलदारांना तात्काळ कारवाईसाठी दिले निवेदन

काटा वृत्तसेवा I  इरशाद दिवाण
कळमेश्वर : तालुक्यातील कळमेश्वर-ब्राम्हणी शहर, वरोडा, झुनकी, सावळी, सिंदी, धुरखेडा, बोरगाव सह आजूबाजूच्या गावांतील हजारो नागरिक रसायनयुक्त दूषित  पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत. वरोडा गावालगत वाहणाऱ्या मोरधाम नदीच्या पात्रात कळमेश्वर एमआयडिसी तील कंपन्यांमधून रसायनयुक्त दूषित पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
                        परिणामी नदीचे पाणी काळे, विषारी, दूर्गंधीयुक्त व फेसाळलेले पूर्णतः दूषित झाले आहे. त्याचा दुष्परिणाम नागरिकांचे आरोग्य, पाळीव जनावरे व परिसरातील शेतजमिनींवर झाला असून संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
                         कळमेश्वर एमआयडीसीतील कारखान्यांमधून विषारी, अशुद्ध, वापरलेले पाणी व रासायनिक टाकावू घटक खुलेआम नदीमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यासाठी व इतर महत्वाच्या वापरासाठी अंत्यंत धोक्याचे झाले आहे. हे विषारी पाणी पिण्यास जनावरेंही धजत नाही. हे विषारी पाणी पिल्याने पाळीव बकऱ्या व दुभती जनावरे मेल्याची नागरिकांची ओरड आहे. या पाण्यातील जलचर जीवजंतू व मासे मरून वर तरंगतांना नेहमीच आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे.
                          परिसरातील  कळमेश्वर-ब्राम्हणी शहर वगळता इतर कोणत्याही गावांत पिण्याच्या पाण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. नाइलाजाने नागरिकांना पिण्यासाठी याच दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करावा लागतो. हेच पाणी नागरिक व जनावरांसाठी वापरत असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पाण्यात हा बदल जाणवू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
                        तातडीने मोका चौकशी करून एमआयडीसीतील कारखान्यांमधून येणारे दूषित पाणी तात्काळ बंद करण्याबाबत तहसीलदार, कळमेश्वर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वरोडा ग्रामपंचायत सरपंच संगीता वासनिक, उपसरपंच हिरालालजी डाखोळे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद राऊत, घनश्याम खडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र डोंगरे, विठ्ठल काकडे, पुंडलिकराव बांबल, देवाजी पुसदकर, महेश मुलमुले व रामचंद्र भोयर इ. उपस्थित होते

1
1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News