सांगली : (12 तासांपूर्वी) सांगली जिल्ह्यातील कुपवाडच्या प्रकाशनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अनिल लोखंडे यांचा त्यांच्या पत्नी राधिकाने हत्या केली. रात्री साडेबाराच्या सुमारास कौटुंबिक वादातून राधिकाने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला, ज्यामुळे अनिल लोखंडे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून, या घटनेचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगर येथील एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे (वय ४५) आणि पत्नी राधिका यांच्यात वाद झाला. वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान राधिकाने नवऱ्याची हत्या केली. अनिल आणि राधिका यांचे लग्न अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते. राधिका ही अनिलची दुसरी पत्नी होती. डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाल्याने अनिल लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत अनिल लोखंडे यांची पहिली पत्नी कर्करोगामुळे मरण पावली होती. त्यांना दोन मुली असून दोघींची लग्न झाली होती. अनिल घरी एकटेच राहत असल्याने नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील 27 वर्षीय राधिका बाळकृष्ण इंगळे हिच्याशी 17 मे 2025 रोजी लग्न लावून दिलं. लग्नानंतर अवघ्या 17 दिवसांनी, वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान, राधिकाने अनिलच्या डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा जागीच खून केला. कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतले असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कुपवाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश लोखंडे यांनी फिर्याद दिली. रात्री साडेबाराच्या सुमारास अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यात कौटुंबिक वाद झाला. या वादातून राधिकाने अनिलच्या डोक्यात कुऱ्हाड हाणली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.