दर्यापूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने रविवारी (दि.६ ) शहरातील गौरक्षण स्थळापासून श्री रामनवमी शोभायात्रा भव्य उत्साह व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली होती. शोभायात्रेने अवघे शहर राममय झाले होते.
शोभायात्रेत प्रारंभी श्री राम, हनुमानजी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पूजन आणि हार अर्पण करण्यात आले. सायंकाळी निघालेली शोभायात्रा जयस्तंभ चौक,बनोस,गांधी चौक मार्गक्रमण करीत बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचली. या शोभा यात्रेमधील प्रभू श्रीराम, बजरंगबली, बाहुबली हनुमान आणि शिवाजी महाराजांचा देखावा, दिंडी पथक व साहसी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. बँड व डीजेच्या तालावर तरुणाई व बच्चे कंपनी जल्लोषात थिरकली. शोभायात्रेने वातावरण राममय व भगवेमय झाले होते. शहरातील प्रमुख रस्त्यावरून जय श्री राम… जय.. जय.. श्रीराम… प्रभू श्रीराम चंद्र की जय.. सीयावर रामचंद्र की जय च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. रात्री १० वाजता शोभा यात्रेचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला.
या शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी विश्व हिंदु परिषद व बजरंग पदाधिकारी, कार्यकर्ते,हिंदू रामभक्त युवकांनी परिश्रम केलेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त श्री राम जन्मोत्सवानिमित्त निघालेली भव्य शोभायात्रा बघण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांची रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात परिविक्षाधीन एसडीपीओ शिवम विसापुरे व सहायक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, मनीष दुबे, पीएसआय हरिहर गोरे, विशाल दंदाळे, रोहित सोनटक्के यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तसेच परिसरातील भाविकभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.