बिहार मतदार यादीच्या वाद ? संसदेत विरोधकांचे आंदोलन
लोकसभा-राज्यसभा उद्यापर्यंत स्थगित
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधानांना उत्तर देण्यास सांगितले आणि सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली.

बिहारमधील मतदार यादीची छाननी, स्पेशल इंटेसिव रिव्हिजन (SIR) विरोधातही विरोधकांनी तीव्र निषेध केला. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज २३ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभा आणि राज्यसभेची बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा होईल.
आज लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळात लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले पण काही वेळातच दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मकर द्वार येथील संसद भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून बिहार एसआयआरचा निषेध केला. हे थांबवण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहे.
त्याचप्रमाणे, राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी बिहारमधील मतदार यादीच्या सुधारणेवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार चर्चेसाठी तयार आहे, पण विरोधी पक्ष निदर्शने करून जनतेचा पैसा वाया घालवत आहेत.
