मृतदेह पोत्यात भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न घरमालकामुळे फसला;
जालना : सूनेने सासूची हत्या करून तिच्या मृतदेहाची पोत्यात भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे घडली आहे. घरमालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून घटनास्थळावरून पसार झाली.
यासंबंधीच्या माहितीनुसार, सविता संजय शिनगारे (45) असे मृत सासूचे नाव आहे. तर प्रतिक्षा शिनगारे असे आरोपी सूनेचे नाव आहे. सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहतो. त्यामुळे सासू व सून या दोघी शहरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे एका किरायाच्या घरात घरात राहत होत्या. या दोघींमध्ये कोणत्याही तरी गोष्टीमुळे वाद झाला होता. या कौटुंबिक वादातून सूनेने बुधवारी पहाटे सासूचे डोके जोरात भिंतीवर आदळले. त्यात सासू सविता यांचा जागीच मृत्यू झाला.
घरमालकाच्या सतर्कतेमुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न फसला
यानंतर प्रतिक्षा शिनगारेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला. त्यानंतर ते पोते घराबाहेर आणले. पहाटे 5.28 च्या सुमारास हा प्रकार सुरू होता. घराबाहेर सुरू असणारी ही हालचाल घरमालकाच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी लागलीच त्याची माहिती पोलिसांना दिली. घरमालकाची ही सतर्कता पाहताच आरोपी सून सासूचा मृतदेह तसाच सोडून घटनास्थळावरून पसार झाली. स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाली. त्यानुसार पोलिस सून व बुलेटस्वाराचा शोध घेत आहेत.
सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सदरबाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी हे फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या शोधार्थ एलसीबी व सदरबाजार पोलिस ठाण्याची पथके रवाना झाली आहेत.
6 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
उल्लेखनीय बाब म्हणजे शिनगारे कुटुंब हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वावरे अंतरवाली येथील आहे. सविता यांचा मुलगा आकाश संजय शिनगारे यांचा 6 महिन्यांपूर्वीच परभणी येथील प्रतीक्षा हिच्यासोबत झाला होता. आकाश हा लातूर येथे खासगी नोकरीस आहे. त्यामुळे सविता व प्रतीक्षा या दोघीच जालन्यात किरायाच्या घरात राहत होत्या.