April 12, 2025 10:11 am

हलाल पद्धतीनेच मटण विकणार; कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही,

नाशिकमधील खाटीक समाजाचा राणेंना ‘झटका’

नाशिक :   शास्त्रीयदृष्टया खाण्यास अयोग्य असलेले झटका मटण महाराष्ट्रात कोणीही स्वीकारणार नाही, आम्ही हलाल पद्धतीनेच मटण विकणार, असा निर्धार नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने घेतल्याची माहिती समाजाचे नेते राजेंद्र बागुल यांनी दिली. कोणाच्याही सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, असे सांगून त्यांनी मंत्री नीतेश राणे यांच्या धार्मिक, जातीय सलोखा बिघडवणाऱ्या भूमिकेला जोरदार झटका दिला आहे.
                         मत्स्य व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी हिंदू समाजातील मटण विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे, या पार्श्वभूमीवर नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने शुक्रवारी बैठक घेतली. हजारो वर्षांपासून आमचा समाज हलाल पद्धतीने मटण विक्री करतो, हिंदू समाजात हेच मटण विकले जाते, त्यामुळे आम्ही हलाल पद्धतीच कायम ठेवणार, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. आमचा समाज अतिशय कष्टाने व्यवसाय करीत आहे, यात कुणी ढवळाढवळ करू नये. आमचा महाराष्ट्र धर्म आहे, त्याला गालबोट लावू देणार नाही, असे राजेंद्र बागुल यांनी सांगितले.
                          या बैठकीस रमेश जाधव, विद्येश लाड, जितेंद्र बागुल, योगेश घोलप, शैलेंद्र बागुल, अंकुश कोथमिरे, अभिषेक कोथमिरे, अनिल कोथमिरे, सिद्धेश बागुल, बाळासाहेब बागुल, रुपेश धनगर, कैलास बागुल, गणेश घोलप, आतंत्र घोलप, दुष्यंत बागुल, प्रितीश खराटे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

पद्धत नाही, मटण खाणं महत्त्वाचं-डॉ. कोल्हे

                          खवय्यांना पद्धतीशी नाही तर मटण खाण्याशी देणं-घे आहे, त्यामुळे मुद्दयांना उकळी नकोच, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हलाल की झटका या वादावर मत मांडले.
                            नाशिक येथे डॉ. कोल्हे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी नीतेश राणे यांच्या मटणास सर्टिफिकेट देण्याविषयीच्या विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. ‘या दुकानांबाहेर कालही रांगा आपण पाहिल्या असतील, सोशल मीडियावर अनेकांनी सांगितलंय, की आम्हाला पद्धतीशी नाही तर खाण्याशी देणं-घेणं आहे, त्यामुळे मुद्दयांपेक्षा रश्श्याची उकळीच महत्त्वाची’, असे ते म्हणाले. ‘इतिहासाचं अगाध ज्ञान असलेल्या थोर व्यक्तींबद्दल मी पामर बोलणार नाही’, अशा शब्दांत त्यांनी खोटा इतिहास सांगणाऱ्या राणे यांची खिल्ली उडवली. औरंगजेबाच्या कबरीविषयी योग्यवेळी माझी भूमिका मांडेन, असेही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News