1960 मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले तेव्हा मराठी भाषेला राज्यभाषा
मुंबई : महाराष्ट्रात हिंदीच्या कथित सक्तीविरोधात रान पेटले असताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी यासंबंधी एक वादग्रस्त दावा करत या वादाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. हिंदी भाषेला मराठी भाषेच्या अगोदर ओळख मिळाली. त्यावेळी महाराष्ट्र अस्तित्वातही नव्हता, असे ते म्हणालेत. अविमुक्तेश्वरानंद यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे कुटुंब हे बिहारमधून महाराष्ट्रात स्थलांतरीत झाल्याचा दावा केला होता हे विशेष.
महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीवरून रान पेटले आहे. या प्रकरणी मनसे व ठाकरे गटाने कडाडून विरोध केल्यानंतर महायुती सरकारने यासंबंधीचा जीआर मागे घेतला. पण त्यानंतरही या वादाची धग कमी झाली नाही. या पार्श्वभूमीवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उपरोक्त विधान केले आहे. अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, हिंदी भाषेला केव्हा ओळख मिळाली? मराठीला केव्हा ओळख मिळाली याचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की, हिंदी भाषेला आपल्या देशात राजभाषा म्हणून त्या अगोदर ओळख मिळाली. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले तेव्हा मराठी भाषेला राज्यभाषा म्हणून ओळख मिळाली, असे ते म्हणालेत.
दहशतवादाला कोणताही रंग नसतो
अविमुक्तेश्वरानंद यांनी भगवा दहशतवाद या मुद्यावरून काँग्रेसला खडेबोल सुनावले. या प्रकरणी त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसमुळेच देशाची फाळणी झाल्याचाही आरोप केला. ज्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली त्यांचे अनुयायी काहीही बोलतात. देशाचे दोन तुकडे ज्यांच्यामुळे झाले ते आम्ही नाही. हिंदू कधीही फूट पाडण्याची गोष्ट करत नाही. तो एकोप्याने राहतो. त्यामुळे दहशतवादाला कोणताही रंग किंवा धर्म नसतो. दहशतवादी हा दहशतवादी असतो. भगवा दहशतवादी असेल तर काय पूजा करणार का त्याची? रंगाचा व दहशतवादाचा काय संबंध?
दहशतवादाविरोधात शून्य सहनशक्ती दाखवण्याची गरज आहे. मुंबईत स्फोट झाले. पण दहशतवादी सापडले नाही. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपही सापडले नाहीत. आयुष्य विविधरंगी असते. त्यामुळे दहशतवादाला रंग नसतो, असे ते म्हणाले.
ठाकरे कुटुंब हे मूळचे महाराष्ट्राचे नव्हे तर बिहारचे
उल्लेखनीय बाब म्हणजे अविमुक्तेश्वरानंद यांनी काही दिवसांपूर्वीच मराठीला कानशिलात हाणणारी भाषा बनवल्याने यश मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच ठाकरे कुटुंब हे मूळचे महाराष्ट्राचे नव्हे तर बिहारचे असल्याचाही दावा केला होता. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती. ते म्हणाले होते, मराठीला कानशिलात लगावणारी भाषा बनवले तर यश मिळेल का? हिंदी ही राजभाषा आहे. त्याचा प्रोटोकॉल असतो.
ठाकरे कुटुंब हे मूळचे महाराष्ट्रातील नाही. ते मगध येथून आले होते. त्यांच्याच कुटुंबातील आजोबा – पणजोबांनी हे लिहून ठेवले आहे. त्यांनाही मराठी येत नव्हती. पण महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले. त्यांना एवढे मोठे केले की, आज त्यांचे वंशज मराठीसाठी भांडत आहेत. मराठीला थोबाडीत देणारी भाषा, मारहाण करणारी भाषा बनवायची आहे का? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला होता.