मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. आमच्यासह संपूर्ण देश 2029 चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावर आत्तातच चर्चा करणे योग्य ठरणार नाही. वडील जिवंत असताना मुलांनी असा विचार करावा ही भारतीय नव्हे तर मुघलांची संस्कृती आहे, असे ते म्हणालेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर निशाणा साधत ते आपला राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानमुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील टीका केली आहे.
मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळी आली नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदीजी आमचे नेते आहेत. ते अजून बरेच वर्षे काम करणार आहेत. त्यांच्याकडे आमच्या सर्वांचा आग्रह आहे. आमच्यासह संपूर्ण देश त्यांच्याकडे 2029 चे पंतप्रधान म्हणून पाहतो. त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. तो विचार करायचाही नसतो. वडील जिवंत असताना मुले असा विचार करतात ही मुघलांची संस्कृती आहे. त्यामुळे आत्ता कुणाचाही व कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही किंवा तसा प्रश्नही उपस्थित होत नाही. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही.