♦ औरंगजेबच्या कबरीवरून रामदेव बाबांचे वक्तव्य नागपुरात पतंजली फूड पार्कच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले मत
नागपूर : नागपुरात पतंजली फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी योगगुरू बाबा रामदेव यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. भारत हा भगवान राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देश असल्याचे सांगत त्यांनी औरंगजेबासारख्या क्रूर शासकांच्या कबरी देशातून हटवण्याचे आवाहन केले.
रामदेव बाबा म्हणाले की, बाबर, अकबर आणि औरंगजेब यांनी भारतात क्रूरता पसरवली. त्यांनी महिलांचा अपमान केला आणि देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. अशी व्यक्ती कधीही आपला आदर्श असू शकत नाही. त्यांच्या कबरी ठेवणे हे गुलामीचे लक्षण आहे.
त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना ते म्हणाले की, ट्रम्प यांनी ‘टेरिफ टेररिझम’चा नवीन मार्ग निर्माण केला आहे. त्यांनी लोकशाहीला धक्का दिला आहे. डॉलरची किंमत वाढवून गरीब विकसनशील देशांच्या चलनाची किंमत कमी केली आहे.
रामदेव बाबांनी ट्रम्प, पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यावर विश्वास ठेवू नये असे सांगितले. काही शक्तिशाली देश जगाला विनाशाकडे नेत असल्याचे सांगत त्यांनी भारतीयांना एकजुटीने सशक्त राष्ट्र निर्माण करण्याचे आवाहन केले.