♦ पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांनो याद राखा; मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
नागपूर : औरंगजेब कबरीच्या वादावरून सोमवारी रात्री 8:30 वाजता नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. विश्व हिंदू परिषदेने (VHP) मुघल सम्राट औरंगजेबाचा पुतळा जाळला आणि त्याची कबर पाडण्याची मागणी केली. यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली. दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना आग लावली. पोलिसांवरही हल्ला झाला. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात डीसीपी निकेतन कदम जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि 55 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
औरंगजेबची कबर हटवण्यावरून नागपूरमध्ये दोन गटांमध्ये मोठा वाद झाला. अखेर या वादाचे रुपांतर दंगलीमध्ये झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाल परिसरात झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर करत गर्दीला पंगवण्याचे काम केले आहे. दंगल झाल्यानंतर यावेळी त्याठिकाणी तोडफोड करण्यात आली. गाड्या जाळण्यात आल्या. तसेच, यावेळी एका गटातील काही तरुणांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याने ते जखमी झाल्याचेही समोर आले आहे. या दगडफेकीत काही पोलीस अधिकारीही जखमी झाल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास मोठ्या संख्येने एक गट महल परिसरात पोहोचला. यावेळी या गटाने अचानक घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही दुसऱ्या बाजूने सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना विभक्त केले. पण, यावेळी चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या आकाराचे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावले जात असल्यामुळे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या वापरून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीमध्ये काही गाड्यांचे नुकसानही झाल्याची माहिती आहे.
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखाः त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राज्याच गुप्तचर खात झोपलेलं आहे का? – दानवे
नागपूर मधील महाल येथे काल तणावपूर्ण निर्माण झालेली स्थिती ही राज्याच्या दृष्टीने भूषावाह नाही. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशाप्रकारे जाळपोळीची घटना घडली. या दंगलीचे लोण दुसरीकडे पोहचता कामा नये. जिल्ह्यात धार्मिक उन्माद होत असताना राज्याच गुप्तचर खात झोपलेलं आहे का? नागरिकांनी फोन करूनही पोलीस रात्री उशिरा घटनास्थळी पोहचले. काही मंत्री दंगल भडकविण्याचं आणि जातीयवाद पसरविण्याचे काम करतात. त्या मंत्र्यांच तोंड शिवले पाहिजे, यामुळे अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे 289 अनव्ये या घटनेवर चर्चा करावी आणि अशा घटनांना प्रतिबंध कराव्यात अशी मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात केली आहे.
नागपुरातील घटना पूर्वनियोजित कट – एकनाथ शिंदे
नागपुरातील हिंसाचार एक पूर्वनियोजित घटना असल्याचा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभा परिसरात बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, नागपुरातील दंगल पूर्वनियोजित कट होता असे वाटते. या भागात दररोज 100 ते 150 दुचाकी पार्क होत होत्या. पण तिथे काल एकही गाडी पार्क नव्हती. इतर दुचाकी आणि चारचाकी जाळून टाकल्या गेल्या. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. हॉस्पिटलला लक्ष्य करण्यात आले. एक 5 वर्षीय मुलगी बालंबाल बचावली. त्या रुग्णालयातील देवदेवतांचे फोटो जाळले. फायर ब्रिगेडची गाडी जाळली, पोलिसांवर हल्ला केला.