August 15, 2025 1:33 pm

नागपूर ग्रामीण भागात २१ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणुकीची धक्कादायक घटना

टेलिकॉम विभाग आणि पोलिसांच्या नावाखाली नागपूरमध्ये व्यक्तीची २१ लाखांची फसवणूक

नागपूर : नागपूर ग्रामीण भागात ऑनलाइन फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टेलिकॉम विभाग आणि मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीची २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
                          बोरगाव (बु.), आदासा येथील दिलीप धनराज धोटे (वय ५५) यांच्याशी कोता राजशेकर याने व्हॉट्स ॲपवरून संपर्क साधला. त्याने स्वतःला टेलिकॉम विभाग आणि मुंबई पोलिसांचा अधिकारी असल्याचे भासवले. २६ नोव्हेंबर २०२४ ते ३ मार्च २०२५ या कालावधीत आरोपीने धोटे यांची फसवणूक केली.

                           आरोपीने धोटे यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून बँक खाते उघडल्याचे आणि मनी लाँड्रिंगचा आरोप असल्याचे सांगितले. नंतर स्वतःला मुंबईचा पोलीस सब इन्स्पेक्टर हेमराज कोली म्हणवून, बँक खाते तपासणीच्या नावाखाली धोटे यांना दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवायला लावले.
                            धोटे यांनी २७ नोव्हेंबर २०२४ रोजी राधे ट्रेडिंग कंपनीच्या खात्यात ११.०९ लाख रुपये आणि २८ नोव्हेंबरला के.आर.एस. ग्लोबल इंटरप्राइजेसच्या खात्यात १० लाख रुपये असे एकूण २१.०९ लाख रुपये पाठवले. फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
                              तपासात आढळले की के.आर.एस. ग्लोबल इंटरप्राइजेसच्या खात्यातील १० लाख रुपये आरोपी कोता राजशेकर याच्या खात्यात वर्ग झाले. त्यानंतर ही रक्कम जयपूर, राजस्थान येथून एटीएमद्वारे काढण्यात आली. २५ मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News