‘खैरी, ढालगाव व कोच्छी पुनर्वसन संदर्भातील बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती’
का टा वृत्तसेवा / सावनेर : सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव आणि कोच्छी येथे जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांच्या उपस्थितीत आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी पुनर्वसनासंदर्भात बैठकींचे आयोजन केले होते. या गावांमध्ये सुरू होत असलेल्या धरण प्रकल्पांमुळे अनेक शेतकरी व कष्टकऱ्यांच्या जमिनी आणि घरे या प्रकल्पात जाणार आहेत. त्यामुळे या गावांचे योग्य पुनर्वसन करून वेळेत त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी या विशेष बैठकींचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांची भूमिका यावेळी प्रकर्षाने मांडली. ते म्हणाले, एका चांगल्या कार्यासाठी येथील नागरिकांनी पिढ्यानपिढ्या असलेली त्यांची मालमत्ता, मग ती शेतजमीन असो वा घर असो, एका राष्ट्रीय कार्यासाठी, धरण उभारणीसाठी, एका शब्दावर दिली आहे. त्यामुळे शासनाने या गावातील नागरिकांना मुबलक प्रमाणात आणि तात्काळ योग्य मोबदला द्यावा, अशी विनंती आ. डाॅ. देशमुख यांनी शासनाला विनंती केली.

त्याचबरोबर, जे नागरिक सध्या गावात अतिक्रमणाच्या जागांवर राहतात, त्यांचाही पुनर्वसन योजनेत समावेश करण्यात यावा, अशी विनंती आमदार डाॅ. देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. तसेच, विविध ठिकाणचे पुनर्वसनाचे काम इरिगेशन विभागाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे आणि उत्तम प्रतीचे व्हावे, अशी अपेक्षा आ. डाॅ. देशमुख यांनी व्यक्त यावेळी व्यक्त केली.एसडीओ साहेबांनी दिलेले मूल्यांकन अधिक न्याय्य आणि शेतकऱ्यांच्या हिताचे व्हावे, यासाठी त्यात शक्य असेल तितका वाढीव विचार करावा. यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जावा. गावातील अतिक्रमणे हटवून, या गावातील प्रत्येकाचे पुनर्वसन हा प्रकल्प सुरू होण्याआधीच योग्य प्रकारे पूर्ण व्हायला हवे. यापुढे या संपूर्ण प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांतर्फे कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही आ. देशमुख म्हणाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना पुनर्वसन प्रकल्पासंबंधी एक निवेदनही देण्यात आले.
या बैठकींमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या भविष्याबाबत शाश्वत विश्वास व्यक्त केला. या बैठकीला डाॅ. राजीव पोतदार, श्री. मनोहर कुंभारे, श्री. अशोक धोटे, श्री. विजय देशमुख, सावनेरचे एसडीओ, शासकीय अधिकारी तसेच विविध गावांचे सरपंच व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.