April 8, 2025 12:54 am

करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

माझगाव कोर्टाचा धनंजय मुंडे यांना झटका

मुंबई : माझगाव सत्र न्यायालयाने करुणा शर्मा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना जोरदार झटका बसला आहे. या प्रकरणी कोर्टाच्या विस्तृत आदेशाची प्रतीक्षा आहे.
                        वांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाने गत महिन्यात धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. धनंजय मुंडे यांनी या आदेशांना माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी आपल्या लग्नाचे विविध पुरावे सादर करत आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला. पण मुंडे यांच्या वकिलांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावला होता. करुणा यांची दोन्ही मुले माझी आहेत, पण त्या माझ्या पत्नी नाहीत, असे ते म्हणाले होते. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावत कौटुंबिक न्यायालयाने यासंबंधी दिलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
                         माझगाव कोर्टाने 29 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार करुणा यांनी आज आपल्या मुलांचे पासपोर्ट, जन्माचे प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज, विमा पॉलिसी, वसियतनामा, स्वीकृतीपत्र आदी विविध दस्तऐवज कोर्टापुढे सादर केले. त्यानंतर आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला होता.

माझगाव कोर्टात आज धनंजय मुंडे व करुणा शर्मा मुंडे यांच्या वकिलांत जोरदार युक्तिवाद

                           तत्पूर्वी, माझगाव कोर्टात आज धनंजय मुंडे व करुणा शर्मा मुंडे यांच्या वकिलांत जोरदार युक्तिवाद झाला. त्यात धनंजय यांच्या वकील सायली सावंत यांनी करुणा शर्मांनी सादर केलेल्या पुराव्यांचे कोणतेही महत्त्व नसल्याचा दावा केला. धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा यांच्याशी लग्न झाले नाही. कोर्टाने त्यांना आपल्या लग्नाचे पुरावे आणण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी वसियतनामा व स्वीकृतीपत्र वगळता इतर दस्तऐवज आणले. त्याला काही अर्थ नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
                            धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच करुणा शर्मा माझ्या पत्नी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तसे कागदपत्रेही कोर्टात सादर केली आहेत. करुणा यांनी सादर केलेल्या वसियतनाम्यातील उल्लेखावरून त्या मुंडे यांच्या पत्नी असल्याचे सिद्ध होत नाही. हा वसियनामाच खोटा आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे केवळ काही काळ त्यांच्यासोबत राहिले (लिव्ह इन रिलेशनशिप), पण त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असेही सायली सावंत यावेळी म्हणाल्या होत्या.
                             त्यानंतर करुणा यांच्या वकिलांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत आम्ही सादर केलेले पुरावे करुणा शर्मा यांचे मुंडेंशी लग्न झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचा युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निकाल राखून ठेवला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या वकिलांना काही मुद्यांवर चांगला युक्तिवाद करता आला नसल्याचे नमूद करत करुणा शर्मा यांनी काही मुद्यांवर स्वतःही युक्तिवाद केला.
                              करुणा शर्मा म्हणाल्या होत्या, कोर्टाचा निर्णय माझ्या बाजूने लागेल याची मला खात्री आहे. आम्ही कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांमुळे त्यांचे वकील हादरलेत. मी मुंडे यांची 1996 पासून पत्नी असल्याचे पुरावे सादर केलेत. माझ्याकडे रेकॉर्डिंगही आहे. ते आज काही कारणास्तव सादर करता आले नाही. त्यांनी तयार केलेले मृत्यूपत्र 2016 चे आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी व अंगठा आहे. त्यातही करुणा शर्मा आपली पहिली पत्नी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः लग्नाचे सर्टिफिकेट माझ्याकडे नसले तरी, ते राजश्री मुंडे (धनंजय मुंडे यांच्या पत्नी) यांच्याकडेही नाही. आमचे मंदिरात लग्न झाले होते. त्यामुळे कोर्ट मुंडे यांचा दावा फेटाळेल यात शंका नाही.

 

                               धनंजय मुंडे यांनी मला रस्त्यावर आणले. मला हिरोईन होण्याची ऑफर होती, पण मी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मला प्रेमात फसवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते. मला व माझ्या मुलांना नेहमी धमकी दिली जाते, असेही करुणा शर्मा यावेळी बोलताना म्हणाल्या होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News