अमरावती : अचलपूर परतवाडा येथील ब्राम्हणसभा कॉलनीत धक्कादायक घटना घडली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराच्या घराजवळच दोन अज्ञात व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आहे.
घटना सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. किरण कैलास शर्मा (६४) या महिला वाघामाता मंदिरावरून दर्शन करून घरी परतत होत्या. त्यांच्यासोबत अर्चना शाह या महिला देखील होत्या. अर्चना शाह त्यांच्या घरी गेल्यानंतर किरण शर्मा त्यांच्या घराचे गेट उघडत होत्या. याच वेळी दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने किरण शर्मा यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर दोघेही भरधाव वेगाने पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पीडित महिला यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आणि पोलीस अधिकाऱ्याच्या घरासमोरच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.