♦ एसटी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला सरकारकडे पैसे नाहीत
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर विविध मुद्दे उपस्थित करत टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळाला नसल्याच्या विषयावरून आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे निशाणा साधला आहे. तसेच पाण्याच्या प्रश्नावरून देखील सरकारला धारेवर धरत मुंबईतील पाणीप्रश्न 48 तासांत सुटला नाही तर मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर येत नाही
आदित्य ठाकरे म्हणाले, महायुतीचे सरकार सत्तेत येईपर्यंत असे वाटत होते की, यांच्याकडे खूप पैसा जमा झाला आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की, काही दिवसांपूर्वी बीएमसी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर आला नाही. आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर येत नाही. फक्त 57 टक्के पगार दिला. या सरकारला सत्तेत येऊन 6 महिने झाले नाहीत, तर अशी परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेकडे देखील राज्य सरकारची जवळपास 16 हजार कोटींची थकबाकी आहे. अशा प्रकारची थकबाकी असताना अनेक कंत्राटदारांना कामे दिली जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. ही वेळ कोणत्याही कर्मचाऱ्यावर येऊ शकते.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार होते तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना जे लोक रस्त्यावर आणत होते, ते लोक आता शांत का आहेत? ते लोक का सरकारला विचारणा करत नाहीत? एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोण उत्तर देणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी पाणी प्रश्नावर देखील भाष्य करत महायुती सरकारवर टीका केली आहे.