♦ वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक नीलेश वाघमारे अधीक्षक वाघमारे निलंबित
♦ नागपूर शिक्षण विभागात मोठा घोटाळा
नागपूर : नागपूर शिक्षण विभागात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट शालार्थ आयडीच्या आधारे अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पात्र ठरवून शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे. शिक्षण उपसचिवांच्या चौकशी अहवालानुसार नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये २०१९ पासून सुमारे ५८० बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या प्रकरणात वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे.
शालार्थ पोर्टलवरील त्रुटींच्या आधारे हा गैरव्यवहार उघडकीस आला. शिक्षण उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानंतर कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याचे स्पष्ट झाले आहे. निलंबन काळात वाघमारे यांना जिल्हा परिषद मुख्यालय सोडता येणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना कोणतीही हालचाल करता येणार नाही. या काळात त्यांना खाजगी नोकरी किंवा व्यवसायही करता येणार नाही.
शिक्षक संघटनांनी वाघमारे यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यांनी मुख्याध्यापकांना चुकीच्या सूचना दिल्याने वारंवार पगार बिल बदलावे लागले. यामुळे शिक्षकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. शिक्षक संघटनांनी त्यांच्याकडून वेतन पथक अधीक्षकाचा कार्यभार काढण्याची मागणी केली होती.