नांदेड जिल्ह्यातील धावरी गावातील घटना; महिलेला अटक
नांदेड : मद्यपी मुलाकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या मातेने आपल्या मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना भोकर तालुक्यातील धावरी बुद्रुक येथे शनिवारी (५ एप्रिल) रात्री घडली. बालाजी नागा राऊत (३५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
नागाबाई राऊत (६०) असे संशयिताचे नाव आहे. मृत बालाजीला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन आपल्या आईसोबत वाद घालायचा, तसेच तो आईला मारहाण देखील करायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी देखील आपल्या मुलासह माहेरी निघून गेली होती. शनिवारी रात्री नागाबाई या शेताच्या आखाड्यावर होत्या. यावेळी मुलगा बालाजी हा मद्यप्राशन करून तिथेआला. नेहमीप्रमाणे तो आपल्या आईसोबत वाद घालत होता. त्याने आईला मारहाणही केली. त्यामुळे नागबाई यांनी दांडक्याने मारून व धारदार शस्त्राने त्याच्या कानावर वार केला.
पोलिसांकडे खुनाची कबुली
खून केल्याची कबुली मृताचा भाऊ नागप्पा राऊत याच्या फिर्यादीवरून भोकर पोलिसांनी नागाबाई यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मद्यप्राशन करून नेहमी मारहाण करत असल्याच्या कारणावरून मुलाचा खून केल्याची कबुली महिलेने दिली.