रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती
नागपूर : राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असून सामाजिक सद्भाव वाढीस लागला पाहिजे, याच हेतूने आज नागपूरमध्ये सद्भावना शांती मार्च आयोजित केला असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
नागपूर शहरात काँग्रेसने बुधवारी सद्भावना शांती मार्चचे आयोजन केले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हा मार्च काढण्यात आला. मार्चमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले.
सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट महाल येथून मार्चची सुरुवात झाली. मार्च कोतवाली पोलीस स्टेशन, बडकस चौक, चिटणीस पार्क, देवडीया भवन, भालदारपुरा चौक, गंजपेठ मार्गे राजवाडा पॅलेस येथे संपन्न झाला. यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी दीक्षाभूमी, टेकडी गणेश मंडळ आणि ताजबाग येथे दर्शन घेतले.
नागपुरातील मागील महिन्यातील धार्मिक हिंसाचारानंतर काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी या समितीला घटनास्थळी भेट देण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर समितीने स्थानिक संस्था आणि नागरिकांशी चर्चा करून माहिती घेतली.
काँग्रेसच्या समितीने राज्यपालांची मुंबई राजभवन येथे भेट घेऊन या घटनेसंदर्भात निवेदन सादर केले. राज्यात सामाजिक सौहार्द आणि शांतता नांदावी या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा सद्भावना शांती मार्च आयोजित केला होता.