♦ निवृत्त महिला अधिकाऱ्याच्या खुनाचा गुन्हा उघड
♦ दागिन्यांसाठी भाडेकरूनेच संपवले
नागपूर : गडचिरोली पोलिसांनी नवेगाव येथील निवृत्त महिला अधिकारी कल्पना उंदीरवाडे यांच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपी विशाल ईश्वर वाळके (४०) याला अटक केली आहे. आरोपी मृतक कल्पना उंदीरवाडे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता.
१३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते २.४० या वेळेत आरोपीने कल्पना उंदीरवाडे (६४) यांच्या डोक्यावर शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने चोरून पळून गेला. कर्जबाजारीपणा आणि उसनवारीच्या पैशांमुळे आरोपीने ही कृती केल्याचे तपासात समोर आले आहे.
मृतक उंदीरवाडे यांचे भाऊ श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी कोणताही पुरावा न मिळाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके तयार करण्यात आली.
तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला. न्यायालयाने आरोपीला २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.