35 वर्षांत प्रथमच जम्मू-काश्मिरात ऐतिहासिक बंद
मुदस्सीर कुलू | पहलगाम : पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यांत २7 पर्यटकांच्या निर्घृण हत्येच्या िवरोधात बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये ऐतिहासिक बंद पाळण्यात आला. ३५ वर्षंात पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद पाहायला मिळाला. यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. संवेदनशील भागात निमलष्करी दल तैनात केले आहे. पीडीपी नेते वहीद पारा आणि मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर लोकांना या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स काॅन्फरन्स, अपनी पार्टीसह अनेक पक्ष व संघटनांनी बंदचे समर्थन केले.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथील पक्ष कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यानंतर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी दहशतवादाचा नायनाट करा, अशा आशयाचे फलकही कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते.
पहलगाम हल्ला, पाकिस्तानविरोधात 5 मोठे निर्णय
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेली सीसीएस बैठक अडीच तास चालली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, कॅबिनेट सुरक्षा समितीने (CCS) 5 प्रमुख निर्णय घेतले आहेत-
पहिला: पाकिस्तानसोबतचा १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित करण्यात आला आहे.
दुसरा: अटारी एकात्मिक तपासणी नाका तात्काळ बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध परवानगी घेऊन या मार्गाने सीमा ओलांडली आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात.
तिसरा: पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी जारी केलेले सर्व SVES व्हिसा अवैध मानले जातील. सध्या SVES व्हिसावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडावा लागेल.
चौथा: नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
पाचवा: भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून त्यांचे संरक्षण, नौदल आणि हवाई दल सल्लागार मागे घेत आहे. संबंधित उच्चायोगांमध्ये ही पदे रद्द मानली जातील.
सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, पहलगामच्या बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी श्रीनगर ते दिल्ली अशा अनेक बैठका झाल्या.
दौरा… पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मूंचा दौरा रद्द
अतिरेकी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारचे कार्यक्रम रद्द केले आहेत. ते कानपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करणार होते. यासोबत माेदी कानपूरमध्ये २० हजार कोटींच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आसाम दौरा स्थगित केला आहे. त्या दोनदिवसीय दौऱ्यावर गुवाहाटी विद्यापीठाच्या ३२ व्या पदवीप्रदान सोहळ्यात सहभागी होण्यासोबत अनेक अन्य कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमणही अमेरिकेचा दौरा सोडून परतल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न
पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा देखील समावेश आहे. मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत. यातील राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. यात मंत्री गिरीश महाजन हे जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत.
काश्मीरमधील ८०%, गुलमर्गमधील ७०% बुकिंग पर्यटकांनी केले रद्द