नागपूर : सद्या राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी आणि धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप भास्कर धोटे यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. के. बनकर यांनी सशर्त जामीन मंजूर केला. दिलीप धोटे यांची विठ्ठल-रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेंतर्गत मोहपा येथे प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये २०१४ मध्ये पाच शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यात आली. ते शिक्षक अस्तित्वात नसताना त्यांच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करून दर महिन्यात वेतन घेण्यात आले. अशा प्रकारे सरकारची एकूण ४२ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली, असा आरोप आहे. घोटाळ्यातील आरोपींविरुद्ध सदर पोलिसांनी ११ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दोन्ही बाजू ऐकून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी बनकर यांनी बुधवारी वयोवृद्धत्व, आरोग्यविषयक समस्या व इतर विविध बाबी लक्षात घेता धोटे यांना सशर्त जामीन मंजूर केला.
‘शालार्थ आयडी महाघोटाळा’बाजांच्या पापाची शिक्षा,
आम्हाला कशाला देता?
नगरपालिका शिक्षकांचे, तीन महिन्यांपासूनचे वेतन थांबवले
उमरेड: ‘शालार्थ आयडी घोटाळा’ उजेडात आल्यापासून शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून अन्य कर्मचारी च संचालकांपर्यंत 18 पेक्षा जास्त भ्रष्ट आरोपींना तुरूंगात डांबल्याने अख्खा शिक्षण विभागाच कोमात गेला आहे. अशातच मागील काही महिन्यांपासून शिक्षकांच्या वेतनाची समस्या निर्माण झाली आहे. घोटाळेबाजांनी शिक्षणाच्या मंदिराला गालबोट लावत घोटाळा केला. त्यांच्या पापाची शिक्षा आम्हाला कशाला देता, असा सवाल विदर्भ नगर परिषद शिक्षक संघाच्या वतीने आयोजित आंदोलनात शिक्षकांनी उपस्थित केला. नागपूर विभागात असलेल्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या सहा जिल्ह्यांतील ३६ नगर परिषदेमधील विदर्भ नगर परिषद शिक्षक संघाच्या वतीने आयोजित आंदोलनात सहभागी शिक्षक, अंदाजे चार हजार शिक्षकांचे वेतन तीन महिन्यांपासून अडकले आहे. एप्रिल, मे आणि जून या तीनही महिन्यांच्या वेतनापासून शिक्षक वंचित आहेत. कार्यरत शिक्षकांसह पेन्शनधारक शिक्षकांचेही तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तरी नागपूर विभागातील शिक्षकांचे तिन्ही महिन्यांचे वेतन व पेंशन विनाविलंब देण्याची मागणी कंली आहे. अशातच निरपराध शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याचाही आरोपही यावेळी केला गेला. याप्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, नरेंद्र चौधरी, मधुकर लांजेवार, यशवंत वंजारी, केशव रामटेके, प्रमोद देशमुख, आशुतोष चौधरी आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.