August 15, 2025 9:56 am

‘CID’ investigation : मुनगंटीवार यांनी केली ‘सीआयडी’ चौकशीची मागणी

चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची चौकशी : संचालकांना नोटीस

उपविभागीय अधिकारी यादव चौकशीप्रमुख, संचालक ‘एसआयटी’ च्या ‘रडार’वर

का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे

चंद्रपूर : जिल्हा बँक नोकरभरतीप्रकरणी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांना चौकशीप्रमुख नियुक्त केले असून काही संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याचबरोबर पोलिसांचे पथक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातही धडकले. आणखी काही संचालकांना गुरुवारी नोटिसा बजावल्या जाणार आहेत.
                        या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी उपविभागीय अधिकारी यादव यांना चौकशीप्रमुख केले. नोकरभरतीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष रावत, माजी संचालक शेखर धोटे, संदीप गड्डमवार, दामोदर मिसार, तत्कालीन उपाध्यक्ष यशवंत दिघोरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. हे संचालक ‘एसआयटी’ च्या ‘रडार’वर असल्याचे बोलले जाते. नोकरभरतीपूर्वीच रवींद्र शिंदे यांनी राजीनामा दिला होता. जेणेकरून चौकशीचा बडगा टाळता येईल.
                          चौकशी अधिकारी यादव यांनी बुधवारी मुंबईत सहकार मंत्र्यांची भेट घेतली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात माहिती मिळवण्यासाठी पोलीस गेले होते. सध्या माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले.

मुनगंटीवार यांनी केली ‘सीआयडी’ चौकशीची मागणी

                       आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवरूनच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना झाली. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची जबाबदारी सोपवल्याने मुनगंटीवार यांनी निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत ‘सीआयडी’ चौकशीची मागणी केली. मुनगंटीवार यांनी बुधवारी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. यावेळी चौकशी अधिकाऱ्यांना बदलण्याचीही विनंती त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News