शिंदे गटाची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द पुढच्या महिन्यात संपेल : असीम सरोदेंचा दावा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत वकील असीम सरोदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द संपुष्टात आणू शकते. सरोदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
न्यायव्यवस्थेवर प्रेम करणाऱ्या असीम सरोदेंची पोस्ट काय आहे.?
वकील असीम सरोदे यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. कुणीही, कसेही, मन-मानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्ष चोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचे वाटते.
असीम सरोदे म्हणाले की, असंवैधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभागी घेणे , केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदा बाह्य वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचे आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. मात्र, घटनापीठाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत असल्याने शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता शिवसेना चिन्ह आणि नावाच्या वादावर 15 सप्टेंबर नंतर किंवा ऑक्टोबरमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.