कळमेश्वर एमआयडीसी रेल्वे गेटवर ५५ कोटींचा उड्डाणपूल
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर : कळमेश्वर शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या रेल्वे गेटवरील वाढत्या वाहतूक कोंडी व नागरिकांच्या तक्रारींचा सकारात्मक निकाल लागला आहे. या रेल्वे गेटवर सेतू बंधन योजनेंतर्गत ५५ कोटींचा उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या रेल्वे उड्डाणपुलाबाबत आ. डॉ. आशिष देशमुख यांनी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत कळमेश्वर रेल्वे गेटमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचे आणि नागरिकांच्या अडचणींचे सविस्तर विवेचन करण्यात आले होते. दररोज हजारो कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना या गेटमुळे अनेक तास वाहतुकीत अडकावे लागत होते.
कामावर उशिरा पोहोचणाऱ्या कामगारांवर शिस्तभंगाची कारवाई होत होती, तर रुग्णवाहिकांमध्ये गंभीर रुग्ण असतानाही वेळेवर उपचार मिळविणे कठीण जात होते. यामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक मोठे प्रश्न निर्माण झाले होते. या सर्व गोष्टींचा सखोल आढावा घेऊन, आमदार डॉ. देशमुख यांनी प्रभावीपणे रेल्वे प्रशासनासमोर मागणी मांडली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सकारात्मक पुढाकारातून अखेर उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे.