काकाच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी जात असताना झालाअपघात
काटोल : काकाच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी जात असलेल्या पुतण्याच्या मोटारसायकलला विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या बसने जोरात धडक दिली. यात पुतण्याचा मृत्यू झाला असून, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मृताच्या भाऊजीसह काकाचा समावेश आहे. ही घटना काटोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर मार्गावरील कुकडीपांजरा शिवारात बुधवारी (दि.५) सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली.
कौस्तुभ सतीश मेश्राम (१९, रा. ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे, तर विशाल दुधाराम मेश्राम (३३, रा. आरमोरी रोड, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर) व उमेश बाबाराव क्षीरसागर (रा. सोनखांब, ता. काटोल) अशी जखमींची नावे आहेत. उमेश कौस्तुभचे भाऊजी (बहिणीचे पती), तर विशाल काका आहेत. विशालच्या धाकट्या भावाचे लग्न असल्याने दोघेही निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी हे काटोल तालुक्यात आले होते. तिघेही बुधवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच ३४ सीएल १७३१) सोनखांब येथून काटोल शहराकडे येत होते. कुकडीपांजरा (ता. काटोल) शिवारात आले असता विरुद्ध दिशेने म्हणजेच काटोलहून नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच ४० वाय ५४९८) त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. तिघेही रोडवर पडल्याने गंभीर जखमी झाले.
नागरिकांनी तिघांनाही जखमी अवस्थेत काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती कौस्तुभला मृत घोषित केले, तर दोन्ही जखमींवर उपचार सुरू केले. याप्रकरणी काटोल पोलिसांनी अपघातातची नोंद करून तपास सुरू केला आहे.