विदर्भातील नऊ जिल्ह्यांत पाऊस नाममात्र : फक्त बुलढाणा – वाशिमला सरासरीपेक्षा जास्त
नागपूर : राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी विदर्भतील अनेक जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. नागपूर प्रादेशिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या १ जून ते ३० जून या कालावधीत विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये जून महिन्याच्या सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात फक्त बुलढाणा आणि वाशिम या दोनच जिल्ह्यात जून महिन्याची सरासरी ओलांडली गेली आहे.
१ ते ३० जून या कालावधीत विदर्भात एकूण १७५ मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र यंदा केवळ १५५ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात सर्वात कमी पाऊस नागपूर जिल्ह्यात झाला असून सरासरी १७३ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत फक्त ९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच पावसाची तूट ४४% इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात १८७ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत फक्त १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच ही पावसाची तूट ४०% इतकी आहे. अमरावती जिल्ह्यात १५० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत फक्त १०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे पावसाची तूट झाली आहे ३३% गोंदिया जिल्ह्यात १९६ मिलिमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत फक्त १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इथे पावसाची तूट ३०% आहे.
वर्धा जिल्ह्यात १७० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि अकोला या चार जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाला असून पावसाची तूट अत्यंत नगण्य आहे. परिणामी, विदर्भातील फक्त बुलढाणा आणि वाशिम या दोन जिल्ह्यातच जून महिन्याची पावसाची सरासरी ओलांडली गेली असून तिथे सामान्य पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
नाशिक – जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही आठ तालुक्यातील १४२ गाव-वाड्यांची टंचाई दूर झालेली नाही. टँकरद्वारे संबंधित ठिकाणी पाणी पुरविले जात आहे. तर ४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मालेगावसह आठ तालुक्यांतील सुमारे ८४ हजार नागरिकांची तहान आजही टँकरवर अवलंबून आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून एक ते २४ जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीतील सर्वसाधारण १३९ मिलीमीटर पावसापेक्षा यंदा अधिक आहे. गेल्या वर्षी सरासरी ११६ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा त्यापेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाला. इगतपुरी आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित १३ तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याची आकडेवारी आहे.