♦ विविध व्याख्याने, परिसंवाद, गटचर्चा, ओपन फोरम, सांस्कृतिकार्यक्रमांचे आयोजन
♦विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डाॅ. बिपिन इटणकर उपस्थीत राहाणार
नागपूर: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘राज्य महिला विभाग आणि सामाजिक न्याय विभाग नागपूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन राज्यस्तरीय महिला परिषदेचे आयोजन उद्या 15 व 16 मार्चला (शनिवार व रविवारला) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर, कामठी रोड, इंदोरा परिसर, नागपूर येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते रामभाऊ डोंगरे व मुक्ता दाभोलकर यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे उद्या शनिवार सकाळी 10.30 वा परिषदेचे उद्घाटन रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संध्या राजूरकर, संपादक (दैनिक बहुजन सौरभ) या तर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डाॅ. बिपिन इटणकर, बाबासाहेब देशमुख प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत राहाणार आहेत.
याप्रसंगी ‘अंधश्रद्धा निर्मूलन राज्यस्तरीय महिला परिषदे’च्या आयोजनामागची भूमिका, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड. मुक्ता दाभोलकर विषद करतील.
परिषदेच्या पहिल्या सत्रात तीन व्याख्यानांमधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुळ संकल्पनेविषयी प्रथम ‘अंनिसची वैचारिक भूमिका’ – उषा शहा (सोलापूर), ‘अंनिसची वाटचाल’ – अण्णा कडलास्कर (पालघर), तर ‘लढे अंधश्रद्धेचे’ यावर मिलिंद देशमुख (पुणे) हे आपले विचार व्यक्त करतील.
दुसऱ्या सत्रात सहा विषयावर खुली गटचर्चा आयोजित केली आहे, यामध्ये गटचर्चे विषय हे ‘स्त्रिया आणि व्रतवैकल्ये’ 2. ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा व दुरदर्शन मालिका’ 3. ‘स्त्रिया: अंधश्रद्धेच्या बळी आणि वाहक’, 4 ‘आधुनिक स्त्री आणि अंधश्रद्धा’ 5. ‘स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या आणि अंधश्रद्धा’ 6. ‘अध्यात्मिक बुवाबाजी आणि स्त्रियांचा वाढता सहभाग’ असे आहेत. या गटचर्चेचे संयोजन किरण जाधव, अंबरनाथ व देवयानी भगत नागपूर, हे करणार आहेत.
दुपारी 4 वाजता ‘अंनिस कायदे’ या विषयावर नंदिनी जाधव (पुणे) आणि ॲड. मुक्ता दाभोलकर (मुंबई) या कायदेविषयक विचार व्यक्त करणार आहेत. सायं. 5 वाजता ‘स्त्रियांचे विशिष्ट जीवनानुभव व अंधश्रध्दा’ या विषयावरील परिसंवादात शुभदा देशमुख (कुरखेडा), ॲड.अंजली साळवे (नागपूर), सुवर्णा दामले (नागपूर) या सहभागी होणार आहेत.
सायंकाळच्या सत्रात सायं. 6 वा दोन व्याख्याने आयोजित केली आहेत, त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर नीता सामंत (चाळीसगाव) या, तर ठाण्याच्या जेष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे या ‘चमत्कार सादरीकरण’ करणार आहेत. सायं. 7 ते 9 अंनिसच्या महिला कार्यकर्त्या ‘पथनाट्य’ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करतील.
दुसरे दिवशी सकाळी 9 वाजता ‘ओपन फोरम’ चे आयोजनकरण्यात आले असून त्यात राज्यभरातून आलेल्या अंनिसच्या महिला कार्यकर्त्या आपले मुक्त विचार व्यक्त करतील. सकाळी 11 वाजता श्रीमती उषा शहा उपस्थित महिला प्रतिनिधी कडून अंनिस विषयी माहिती असणारी प्रश्नावली सोडवून घेतील.
सकाळी 11.30 ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ राज्यस्तरीय महिला परिषदेचा समारोप सिध्दार्थ गायकवाड, उपायुक्त, समाज कल्याण विभाग उपायुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. परिषदेचे संयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नागपूर शाखेचे कार्यकर्ते रामभाऊ डोंगरे, चित्तरंजन चैरे, डाॅ. सुनील भगत, देवानंद बडगे, गौतम पाटिल, चंद्रशेखर मेश्राम, विजया श्रीखंडे, देवयानी भगत, प्रा. पुष्पा घोडके, वर्षा साहरे, मंगला गाणार, विजया ठाकरे इ. राज्यस्तरीय महिला परिषदेचे संयोजन करत असुन परिषदेसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.