
अजितदादांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री
12 मिनिटांचा शपथविधी; शरद पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय
मुंबई: राज्याच्या राजकारणात भावनांचा कळस गाठणारा क्षण शनिवारी पाहायला मिळाला. अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अवघ्या 12 मिनिटांत पार पडलेला हा शपथविधी केवळ राजकीय नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत भारलेला ठरला.
शनिवारी दुपारी 2 वाजता विधानभवनात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षनेत्या म्हणून एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सायंकाळी ठीक 5 वाजता राजभवनात त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
या शपथविधीतील एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अनुपस्थिती, जी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील तरुण नेते युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक शब्दांत शुभेच्छा दिल्या. ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी लिहिले,
“सुनेत्राकाकी अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मनापासून अभिनंदन. आदरणीय अजितदादांनी ज्या निर्धाराने, कर्तव्यनिष्ठेने आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राची सेवा केली, त्याच मूल्यांवर आपणही वाटचाल कराल, असा विश्वास आहे.”

अजित पवार यांच्या आठवणी ताज्या असतानाच सुनेत्रा पवार यांची ही जबाबदारी स्वीकारणे हे केवळ सत्तांतर नाही, तर राज्याच्या राजकारणातील एक भावनिक अध्याय ठरत आहे.









Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0