’’माझेच चित्र काढून! रंगविले मी ! अनाथ जिंदगीला! गुंतविले मी…!!’’
चित्रकलेचा छंद हा मला लाभलेला एक स्वयंप्रकाशित दीप आहे. मी कधीच कोणते प्रशिक्षण घेतले नाही, ना चित्रकलेची कोणतीही परीक्षा दिली. मात्र, सातवीत शिकत असताना अभ्यासात रस कमी होत गेला आणि हळूहळू मला चित्रकलेची गोडी लागली. वर्गातल्या मुलांना विषयाशी संबंधित आलेख, रेखाटनं सहजतेने आणि आवडीने काढून देत असे. तिथूनच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि मी चित्रकारितेच्या विश्वात प्रवेश केला.
आज मी कोणतेही चित्र हुबेहूब नक्कल करू शकतो, प्रतीकृती सहज उतरवू शकतो. मनात असलेल्या कोणत्याही संकल्पनेनुसार चित्र साकारण्याची ताकद माझ्या हातात आली आहे. माझ्या स्वतःच्याच चित्रविश्वात, मी आता स्वतःच एक चित्र झालो आहे.
तसा मी अनाथच. माझ्या आईबाबांना मी कधी पाहिलं नाही. माझा सांभाळ मावशीने केला. तिच्याच कुशीत मी मोठा झालो. माझ्यासाठी तीच सर्वकाही आहे. या अनाथ चित्रकारितेनेच मला “मनीष आर्टिस्ट” अशी ओळख दिली. केव्हा, कशी मिळाली, ते आठवत नाही. पण सोशल मीडियामुळे ही ओळख गावोगाव पसरली. गल्लीतली लहान मुलं अनेक अनोळखी पाहुण्यांना आमच्या घराजवळ आणून, माझ्याकडे बोट दाखवत सांगतात हाच तो “मनीष आर्टिस्ट”, तेव्हा मला असं वाटतं, जसं लोकप्रियतेच्या एखाद्या हिमालयावर उभा आहे!
हीच जाणीव मला झाली जेव्हा आदरणीय प्रकाश आंबेडकर, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या छत्रछायेत मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. त्यांनी मला गगनभरारीसाठी प्रोत्साहन दिलं, या अनाथाला नाथ बणण्याची प्रेरणा दिली. मनीष रक्षित, बालू दुपारे, आसिफ शेख, सतीश गजबे, शाकीर शेख व लेखक -दिनकर मडकवाडे या मित्रांनी माझ्या पंखांना कमालीचं बळ दिलं. माझ्या सारख्या अनाथाला अश्या असंख्य हातांनी जो मदतीचा हात दिला, त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहिल.
तसंच, शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेल्या ‘नाम फाउंडेशन’चे संस्थापक, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनाही माझं चित्र आवडलं. मी त्यांच्या साठी एक सुंदर चित्र तयार केलं आणि त्या चित्राला साजेशी एक गझल लिहिली. आणि काय आश्चर्य! लगेच त्यांचं बोलावणं आलं! खरं सांगायचं तर, खुद्द नाना पाटेकर माझी मुलाखत घेणार आहेत!
ज्याचं बालपण बेरंग होतं, त्या अनाथ जीवनात रंग भरून गेली आहे…