कोंढाळी येथील माधवबाग पंचकर्म रुग्णालयातर्फे आयोजन
योग शिक्षक अशोक कडू यांच्या योगसाधनेची दखल
का टा वृत्तसेवा : सचिन बांगर
काटोल : कोंढाळी येथील माधवबाग पंचकर्म रुग्णालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग शिक्षक अशोक कडू यांचा सत्कार करण्यात आला. काटोल पंतजली योग समितीचे अध्यक्ष अशोक कडू यांच्या योगाचा प्रसार, प्रचार व सूदृढ समाज निर्मितीत मोलाच्या योगदानाची दखल घेत यथोचित गौरव करण्यात आला.

नागपूर जिल्हा परिषदेच्या काटोल पं. स. अंतर्गत शाळेतून सेवानिवृत्त झालेले योगशिक्षक अशोक कडू यांनी योगसाधनेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. योगसाधनेचा 35 वर्षाचा दांडगा अनुभवाने जिल्ह्यातील शेकडो शाळांमधून हजारोच्या संख्येत विद्यार्थ्यांना योगाचे धडे देउन निरोगी जीवनाचा कानमंत्र दिला आहे.

रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठ हरीद्वार, लोणावळा, अमरावती इ. येथील संस्थांमधून, शिबीरांतून योगाचे अभ्यास करून घेवून सातत्याने योगाच्या प्रसार-प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे. संपूर्ण जिल्हात योगाचा प्रचार प्रसार करीत आहे योगशिक्षक कडू हे नियमितपणे योग प्र्रशिक्षण वर्गांचे आयोजन करत असतात. अशोक कडू यांच्या गेल्या तीन दशकातील योगसाधनेची दखल घेत ‘माधवबाग’ या आयुर्वेद व पंचकर्म क्षेत्रातील नामांकित संस्थेने त्यांचा गौरव केला. यासाठी आमदार चरणसिंग ठाकुर, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार आशिष देशमुख, विजय महाजन, सोपान हजारे, दिलीप घारड, रामकृष्ण जंगले, राजू तरटे, मारोतराव बोरकर, शोभना बोडखे, दिलीप वैध, किशोर परिहार, प्रभाकर भांगे, रंजना काळमेघ, दीपक वरुडकर, राजू डंबाळे इ. नी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सत्कार सोहळ्याला माधवबाग रूग्णालयाचे योग तज्ञ डाॅ. निलेश ठाकरे, योग शिक्षक मनोहर पठाडे, डाॅ. मदन ढोले, योगगुरू हंसराज मिश्रा, आंतरराष्ट्रीय योगपटू सचिन वाळकेे, हरीश्चंद्र देशमुख, रूग्णालयाचे कर्मचारी व मोठया प्रमाणावर योगसाधक इ. उपस्थित होते.
